विधानसभेला ‘एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही’
By Admin | Updated: July 21, 2014 00:41 IST2014-07-21T00:29:57+5:302014-07-21T00:41:12+5:30
रमाकांत खलप : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

विधानसभेला ‘एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही’
इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीत मोदींच्या वादळाने कॉँग्रेसला धक्का दिला. मात्र, वादळ पुन्हा-पुन्हा येत नसते. आगामी विधानसभा निवडणूक ही एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही, असा लढा आहे. हा लढा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धाराने प्रचार यंत्रणा राबवावी, असे आवाहन अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे समन्वयक रमाकांत खलप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील कॉँग्रेस समितीत आज, रविवारी कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
खलप म्हणाले, आपल्यातील अंतर्गत गटबाजी, रस्सीखेच बाजूला ठेवून वज्रमूठ करावी आणि एकजूटता कशी असावी, हे दाखवून द्यावे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून कॉँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे, असे ते म्हणाले.
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, जनमाणसांत निर्माण झालेल्या वातावरणाचा फटका गत लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला बसला आहे. भाजपचा भपकेपणाचा फुगा आता फुटला आहे. ‘अच्छे दिन’पेक्षा होते तेच दिवस चांगले होते, अशी म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे मरगळ झटकून कामाला लागावे. कॉँग्रेस पक्षानेही उमेदवारीची घोषणा सत्वर करण्याची गरज आहे.
माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी, आम्हीच आमचे शत्रू बनल्याने पराभवाला तोंड द्यावे लागले. मात्र, इथून पुढच्या काळात हातात हात घालून पक्षाला नव्याने उभारी देणार असल्याचे सांगितले. जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ जागांवर उमेदवारांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत कॉँग्रेसमध्ये कोणताही तंटा नाही, असे स्पष्ट केले.
यावेळी प्रसाद खोबरे, शहर कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, आदींची भाषणे झाली. आपल्या भाषणामध्ये अनेक नेत्यांनी प्रकाश आवाडेंना उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रास्ताविकात कॉँग्रेसच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षण सभापती तौफिक मुजावर यांनी केले. कार्यक्रमास नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, अशोक आरगे, सांगली जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, शहर महिला कॉँग्रेस अध्यक्षा अंजली बावणे, किशोरी आवाडे, राहुल खंजिरे, शेखर शहा, रमेश कबाडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
२००९ च्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत : पी. एन.
२००९ च्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत आहे, असा थेट आरोप करीत माजी आमदार पी. एन. पाटील यांनी सहकारी पक्षाने दगा दिल्याचे सांगितले. भाजपच्या मुख्य प्रचारात नेत्यांच्या स्टेजवर सहकारी पक्षाचे लोक जाऊन बसले. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.