उंबर्डेतील वायरमनचा राधानगरीत अपघाती मृत्यू
By Admin | Updated: May 29, 2016 00:19 IST2016-05-29T00:17:39+5:302016-05-29T00:19:34+5:30
दुचाकीला ट्रकची धडक : मित्राच्या साखरपुड्याहून येताना दुर्घटना

उंबर्डेतील वायरमनचा राधानगरीत अपघाती मृत्यू
वैभववाडी : उंबर्डे मेहबूबनगर येथील सय्यद जाफर लांजेकर (वय २३) या युवकाचा तारळे (ता. राधानगरी) येथे ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला.
वाडीतील मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून येताना दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे उंबर्डे मेहबूबनगरवर शोककळा पसरली आहे. सय्यद हा वेंगसर येथे वायरमन होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील किरवे येथे मेहबूबनगर येथील मित्राच्या साखरपुड्यासाठी सय्यद सकाळी आपल्या दुचाकीने नातलगासमवेत गेला होता. तेथून दुपारी ते उंबर्डेला येण्यास निघाले होते. तारळेनजीक ट्रकची त्यांना धडक बसली. ट्रकच्या मागच्या टायरखाली सापडल्याने सय्यदचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर त्याच्या मागे बसलेला युवक सुदैवाने बचावला असून, त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर काहीच मिनिटांत साखरपुड्याला गेलेल्या मंडळींची वाहने घटनास्थळी पोहोचली. सय्यद मृतावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसताच सर्वांनी हंबरडा फोडला. सय्यदच्या अपघाती मृत्यूची माहिती उंबर्डेत कळताच मेहबूबनगरवर शोककळा पसरली. सोळांकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यावर रात्री नातेवाइकांनी सय्यदचा मृतदेह ताब्यात घेतला. तेथून रात्री उशिरा मृतदेह उंबर्डे येथे आणला.
सय्यद हा वीजवितरण कंपनीत आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे
वायरमन म्हणून वेंगसर गावाची जबाबदारी होती. तो शांत व मनमिळाऊ होता.
सय्यदच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ आहे. सय्यदच्या अपघाती मृत्यूबद्दल उंबर्डे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)