डाव्यांचा आज मुंबईत महामोर्चा
By Admin | Updated: March 11, 2015 00:31 IST2015-03-11T00:24:43+5:302015-03-11T00:31:21+5:30
पानसरे हत्या प्रकरण : मारेकऱ्यांच्या अटकेसाठी राज्यातील ६० हजार कार्यकर्ते रवाना

डाव्यांचा आज मुंबईत महामोर्चा
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यासाठी सर्व डाव्या पक्षांतर्फे आज, बुधवारी मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आणि पुरोगामी चळवळीतील सुमारे पाच हजार कार्यकर्ते मंगळवारी मुंबईला रवाना झाले आहेत. या मोर्चात महाराष्ट्रातील सुमारे साठ हजार कार्यकर्ते सहभाग घेणार आहेत. भायखळा येथील राणीच्या बागेपासून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी दीड वाजता हा मोर्चा सीएसटी परिसरातील आझाद मैदान येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, माकपचे सचिव अशोक ढवळे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, प्रताप होगाडे यांच्यासह डाव्या आणि पुरोगामी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पानसरेंच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीचे निवेदन देण्यात येईल. या मोर्चात महाराष्ट्रभरातील सर्व डाव्या व पुरोगामी पक्षांचे सुमारे साठ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी आझाद मैदान येथे दोन हजार चौरस फूट आवारात मंडप तयार केला आहे. इथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत पानसरेंच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा, नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातून पाच हजार कार्यकर्ते रवाना
कोल्हापूर शहरातून या मोर्चासाठी पाच हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी कोयना एक्स्प्रेसने सुमारे १३०० कार्यकर्ते रवाना झाले. सायंकाळी महालक्ष्मी रेल्वेने दीड हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेसचे जनरल डबे मंगळवारी फुल्ल झाले. कार्यकर्त्यांसाठी कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेतर्फे वीस ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली होती.