लर्निंग लायसेन्स आता ‘आॅनलाईन अपॉइंटमेंट’वर
By Admin | Updated: August 12, 2014 00:40 IST2014-08-12T00:28:32+5:302014-08-12T00:40:54+5:30
प्रादेशिक परिवहनद्वारे कळविली जाणार तारीख

लर्निंग लायसेन्स आता ‘आॅनलाईन अपॉइंटमेंट’वर
कोल्हापूर : जग सोशल मीडियाच्या छायेखाली आले आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागानेही कात टाकण्याचे ठरविले आहे. त्यानुसार नवीन वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काढण्यासाठी आता रांगेत अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या नागरिकांना माराव्या लागणार नाहीत. कारण आज, सोमवारपासून परवाना काढण्यासाठी थेट आॅनलाईनद्वारे अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.
यानुसार दिलेल्या तारखेला कार्यालयात उपस्थित राहून परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतरच मिळणार गाडी चालविण्याचा शिकाू परवाना. नुकतेच राज्य शासनाच्या परिवहन विभागाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पहिले पाऊल म्हणून आॅनलाईन पद्धतीचा अवलंब केला आहे. यामध्ये वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळण्यासाठी चालकांना यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागत होता. आता मात्र नव्या योजनेनुसार अर्जही आॅनलाईन भरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सिस्टम जनरेटेड कार्यालयात येण्याच्या दिलेल्या तारखेनुसार अर्जदार शिकाऊ उमेदवारांना यावे लागणार आहे. त्यानुसार आता शिकाऊ परवाना परीक्षा द्यावी लागणार आहे.
या परिवहन खात्याच्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर या शहरांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी केली आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी आज, सोमवारपासून कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातही केली आहे. (प्रतिनिधी)