हुपरीत जलवाहिनीला गळती
By Admin | Updated: August 26, 2014 21:51 IST2014-08-26T20:40:16+5:302014-08-26T21:51:41+5:30
पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा : आठ दिवस पाण्यासाठी होणार पायपीट

हुपरीत जलवाहिनीला गळती
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) च्या नळपाणी पुरवठा योजनेला जगनाथ मळा-यळगूड नजीक लागलेल्या गळतीमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. या कामाच्या दुरुस्तीसाठी आणखी आठ दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा समिती सभापती गणेश वार्इंगडे यांनी दिली.
योजनेचे काम निकृष्टपद्धतीने झाल्याने मुख्य जलवाहिनी व एअर व्हॉल्वना वारंवार मोठ्या प्रमाणात गळती लागण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी फरफट होत आहे. हुपरी शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची योजना भारत निर्माण योजनेतुन राबविण्यात आली आहे. सुमारे ११ कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होताच गतवर्षापासून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अत्यंत घाईगडबडीने व निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला व एअर व्हॉल्वला वारंवार गळती लागत आहे.
त्यामुळे गळती दुरुस्तीच्या कामासाठी आठ ते पंधरा दिवस योजना बंद ठेवावी लागते. परिणामी पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना सातत्याने पायपीट करावी लागत आहे. काम निकृष्ट झाले असतानाही त्याचा जाब ठेकेदाराला विचारण्याचे धाडस लोकप्रतिनिधी दाखवत नाहीत.
दरम्यान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या हेवेदाव्यामुळे योजनेच्या कामास अद्यापपर्यंत मुहूर्तच मिळालेला नाही. सध्या लागलेल्या गळतीमुळे आताही आठ दिवस शहराला पाणी पुरवठा होणार नाही.