सुरळीत पाणीपुरवठ्याला गळत्यांचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:00+5:302021-08-22T04:27:00+5:30
कोपार्डे : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला विविध ठिकाणी वारंवार गळती लागत असल्यानेच शहरात बहुतांशवेळा पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडून ...

सुरळीत पाणीपुरवठ्याला गळत्यांचा अडसर
कोपार्डे : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला विविध ठिकाणी वारंवार गळती लागत असल्यानेच शहरात बहुतांशवेळा पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडून पडते. यातून अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पाईपलाईनला वारंवार होणाऱ्या गळत्यांकडे पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष का करतो, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात बालिंगा व नागदेववाडीतील पंपिंग स्टेशनपासून चंबुखडी व पुईखडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळत्या आहेत. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून येथे गळती असूनही प्रशासनाकडून या गळत्या काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वेळीच थांबवले तर शहरात सुरळीत पाणीपुरवठा करणे प्रशासनालाही शक्य होणार आहे.
चौकट : तर यंत्रणा उंचीवर ठेवणे गरजेचे
प्रत्येक महापुरावेळी पंपिंग स्टेशनमधील विद्युत मोटर, पॅनेल, स्टार्टर व विद्युत पुरवठा करणारे मोठे ट्रान्सफॉर्मर पाण्यात जाऊन शहराचा पाणीपुरवठा चार ते आठ दिवस बंद ठेवण्याची वेळ येते. पाणीपुरवठा खंडित झाला की, यंत्रणा पाण्यात बुडाली आहे हे ठरलेले उत्तर प्रशासनाकडून नेहमीचे दिले जाते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता कोल्हापुरात महापूर आता नित्याचा झाला आहे. त्यामुळे या काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर ट्रान्सफॉर्मर व पाणीुपरवठा यंत्रणा सुरक्षित उंचीवर ठेवणे गरजेचे आहे.
चौकट : कोट्यवधीची यंत्रणा...पण सुरक्षित आहे का
शहराला पाणीपुरठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवर आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवून जास्तीत जास्त ॲटोमायझेशन करण्यात आले आहे, पण कोट्यवधींची ही यंत्रणा सुरक्षित आहे का याबाबत शंकाच आहे. बालिंगा व नागदेववाडीतील इलेक्ट्रिक यंत्रणेत बदल करून नवीन अत्याधुनिक संगणकीय इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. पुणे येथील कंपनीकडून बालिंगा पंपिंग स्टेशनवर अडीच कोटींचे पॅनेल बसवण्यात आले, तर रॉ वॉटर येथेही नवीन पॅनेल बसविले आहेत. मात्र, या पॅनेलच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने पाहिले जात नाही. मुसळधार पावसात या नवीन पॅनेलवर गळती लागली होती. कर्मचाऱ्यांनी यावर ताडपत्री टाकून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. हे इलेक्ट्रिक पॅनेल असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी सुसज्ज केबिन असायला हव्यात, पण याकडे दुर्लक्ष होत आहे.