बालिंग्यातील कचरा डेपोला पत्र्याचे कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:02+5:302021-08-22T04:27:02+5:30
कोपार्डे : बालिंगा पुलाच्या पूर्वेला असणाऱ्या खाणीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याने कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. यासंदर्भात ‘लोकमत’च्या ...

बालिंग्यातील कचरा डेपोला पत्र्याचे कुंपण
कोपार्डे : बालिंगा पुलाच्या पूर्वेला असणाऱ्या खाणीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याने कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. यासंदर्भात ‘लोकमत’च्या १९ ऑगस्टच्या अंकात "बालिंगा कचरा डेपोने श्वास घुसमटतोय" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. शनिवारी नागदेववाडीचे सरपंच योगेश ढेंगे यांनी या कचरा डेपोला भेट देऊन कचरा व्यवस्थापन कसे करता येईल याची पाहणी केली. रस्त्यावर कचरा येऊ नये यासाठी कचरा डेपोलो पत्र्याचे कुंपण घालणार असल्याचे ढेंगे यांनी सांगितले. नागदेववाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर- गगनबावडा मार्गाला लागून असणाऱ्या खाणीत बालिंगा व नागदेववाडी गावचा कचरा टाकण्यात येतो. या खाणी सध्या कचऱ्याने भरल्या आहेत. त्यामुळे हा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. पावसाच्या पाण्याने आणि पुराचे पाणी कचऱ्यात शिरल्याने कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. सरपंच योगेश ढेंगे यांनी कचरा डेपोच्या भोवताली कोल्हापूर -गगनबावडा रस्त्याच्या बाजूने पत्रा मारून कचरा रस्त्यावर येऊ नये व दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
कोट : कचरा व्यवस्थापन करण्यासाठी बालिंगा, नागदेववाडी गावाकडे जमीन नाही. त्यामुळे खाणीमध्ये कचरा टाकून व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरासह उपनगरातील काही अज्ञात लोक कचरा थेट रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने पत्रा मारण्यात येणार आहे.
योगेश ढेंगे, सरपंच -नागदेववाडी.