नेत्यांची उमेदवारी; बोनस अधांतरी

By Admin | Updated: October 5, 2014 23:04 IST2014-10-05T22:54:11+5:302014-10-05T23:04:38+5:30

यंत्रमाग कामगारांची आंदोलने ठप्प : दोन कामगार निवडणूक रिंगणात

Leadership; Bonus end | नेत्यांची उमेदवारी; बोनस अधांतरी

नेत्यांची उमेदवारी; बोनस अधांतरी

राजाराम पाटील- इचलकरंजी शहर व परिसरात असलेल्या वस्त्रोद्योगातील सुमारे ६२ हजार कामगारांच्या दिवाळी बोनसचा
प्रश्न निवडणुकीच्या भोवऱ्यात गुरफटल्याने कामगार वर्गात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. निवडणुकीसाठी सदाशिव मलाबादे व मिश्रीलाल जाजू हे कामगार नेते उभे आहेत. आचारसंहितेमुळे बोनसबाबतची होणारी आंदोलने ठप्प झाली असून, मिळेल त्या बोनसवर समाधान मानण्याची वेळ आता कामगारांवर येऊ घातली आहे.
इचलकरंजी व परिसरात विविध प्रकारचे दीड लाख यंत्रमाग आहेत. तसेच यंत्रमाग उद्योगाशी निगडित सायझिंग, प्रोसेसर्स, रंगण्या, यार्न टिष्ट्वस्टिंग असे कारखाने आहेत. अशा उद्योगात पुरुषांबरोबर महिलाही कामगार आहेत. महिला कामगारांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. सर्वांत जास्त यंत्रमाग कामगारांची संख्या सुमारे ३५ हजार असून, अंशत: स्वयंचलित व स्वयंचलित मागांवर दोन हजार कामगार आहेत. यंत्रमागांशी सलग्न असलेल्या सायझिंग उद्योगात ७५००, प्रोसेसिंग उद्योगात ५५०० कामगार असून जॉबर, कांडीवाला, वहिफणी कामगारांची एकूण १२ हजार संख्या आहे.
याशिवाय सूत व कापड यांची वाहतूक करणाऱ्या हमालांची संख्या चार हजार आहे. कापडाची घडी घालणारे, कापड गाठी बांधणारे, गारमेंट उद्योग अशाही क्षेत्रात कार्यरत असणारे पाच हजार कामगार आहेत. या सर्वांना मिळून सुमारे १०० कोटी रुपयांचा दीपावली बोनस मिळतो. वस्त्रोद्योगातील विविधतेप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असणाऱ्या डझनभर कामगार संघटना आहेत.
दरवर्षी दसरा-दिवाळीचा हंगाम आला की, दोन-तीन आठवडे बोनसच्या मागणीसाठी निवेदने देणे, मोर्चे काढणे, मागण्यांसाठी मतभेद, संघर्ष, वाद आणि त्यापाठोपाठ सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालयात बैठका अशा टप्प्यांवर हे आंदोलन चालते.
आता मात्र निवडणूक कार्यक्रम चालू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रवादी कामगार संघटनांचे प्रमुख विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. तर सर्वच कामगार संघटनांचे पदाधिकारी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेत गुंतलेले आहेत. याशिवाय निवडणूक आचारसंहितेचा बडगा आहेच.
अशाप्रकारे कामगार संघटना निवडणुकीत मश्गुल असल्याने
त्यांना बोनसकडे बघण्यासाठी
‘वेळ’ नाही. पण आंदोलनामुळे कामगारांचा दोन-चार टक्के वाढणारा बोनस आता ‘जैसे थे’ राहणार आहे. यामुळे कामगार वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

दीपावली बोनसची परंपरा ४० वर्षांपासूनची
इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगात दिवाळी बोनसची परंपरा सुमारे ४० वर्षांपूर्वीपासूनची आहे. पूर्वी याला दिवाळी बक्षीस किंवा सानुग्रह अनुदान असे बोलले जात असे. यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीबाबत आंदोलन झाले की, त्या पाठोपाठ दीपावली बोनसच्या संदर्भात संघर्ष निर्माण होत असे. अनेकवेळा कामगार मजुरीचा प्रश्न सुटला, तरी दीपावली बोनसची चर्चा अनेक बैठकांतून होत असे. हा बोनस वार्षिक पगाराच्या टक्केवारीने देण्याचा निर्णय साधारणत: दहा वर्षांपासून घेण्यात आला. वस्त्रोद्योगातील कामगार टंचाईमुळे सोळा टक्क्यांपासून तीस टक्क्यांपर्यंत बोनस दिला जात असे. अशा बोनसबाबत सुद्धा अनेकवेळा वाद झाला. आता कामगारांच्या मजुरीवाढीबरोबरच दीपावली बोनसची टक्केवारी निगडित केली असून, त्याप्रमाणे गतवर्षी झालेला निर्णय १६.६६ टक्क्यांचा आहे.

मिळेल त्या रकमेवर समाधानाची वेळ
यंत्रमागांची संख्या १.२५ लाख.
१) कामगार संख्या ३५ हजार
२) मिळणारी बोनस रक्कम ५०
कोटी रुपये.
सेमी आॅटो-आॅटोलूमची संख्या २५ हजार :१) कामगार संख्या २ हजार २) मिळणारी बोनस रक्कम ४ कोटी रुपये.
सायझिंग कारखान्यांची संख्या १५० १) कामगार संख्या ७५००
२) मिळणारा बोनस १५ कोटी रुपये.
यंत्रमाग व आॅटो माग कारखाने १० हजार. :
१) जॉबर (मेकॅनिक) १५००
२) कांडीवाला कामगार ७५००
३) वहिफणी कामगार ३०००
४) मिळणारा दिवाळी बोनस १५
कोटी रुपये.
सूत व कापड वाहतूक हमाल ४००० : १) मिळणारी बोनस रक्कम ८ कोटी रुपये.

Web Title: Leadership; Bonus end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.