संघर्षातून समृद्ध वाटचाल करणारे नेते : डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:56+5:302021-05-05T04:40:56+5:30

...... शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सहकार चळवळीची गती वाढवीत विकासाला सामान्य माणसाच्या दारापर्यंत नेण्याची किमया मंत्री राजेंद्र पाटील यांनी ...

Leaders who prosper through struggle: Dr. Rajendra Patil (Yadravkar) | संघर्षातून समृद्ध वाटचाल करणारे नेते : डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर)

संघर्षातून समृद्ध वाटचाल करणारे नेते : डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर)

......

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सहकार चळवळीची गती वाढवीत विकासाला सामान्य माणसाच्या दारापर्यंत नेण्याची किमया मंत्री राजेंद्र पाटील यांनी साधली आहे. सहकार महर्षी श्यामराव पाटील (यड्रावकार) यांनी कष्टकरी, शेतकरी, कामगार, उद्योजक यांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम राजेंद्र पाटील करीत आहेत.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेत युवक कार्यकर्त्यांच्या साथीने त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपले कर्तृत्व अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अगदी देशपातळीवर संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असल्याने त्यांना यशाची सोबत लाभत चालली आहे.प् रचंड मेहनती, जिद्दी, व्यापक विचारांची पाठराखण करीत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी, अभ्यासू बनले आहे.

अध्यक्षपद भूषवीत असलेला शरद सहकारी साखर कारखाना अल्पावधीत कर्जमुक्त करून सहकारात आदर्श निर्माण केला. अत्यंत उत्कृष्ट व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारा म्हणून हा कारखाना दिमाखात वाटचाल करीत आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. कितीही संकटे आली तरी ती झेलण्याची धमक कारखान्यात आहे.

सूतगिरणी, बँक, एमआयडीसी, शिक्षण संस्था, असा अनेक संस्थांचा मिळून मोठा उद्योग समूह त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आयडियल असा नावलौकिक निर्माण केला आहे.

नैसर्गिक संकटात मदतीसाठी धावून जाण्यात हा उद्योगसमूह नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मदतगाराची भूमिका कायमपणे निभावली आहे. सत्ता असो व नसो लोकांच्या मदतीला सतत धावून जाणारा हा उद्योग समूह सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.

जय, विजयाची कधी तमा बाळगली नाही. त्यामुळे सतत पुढे चालत राहिले. यामुळेच अपक्ष उभे राहूनसुद्धा त्यांचा प्रचंड मतांनी विधानसभेला विजय झाला. ते इथपर्यंत थांबले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यांनी मोठ्या विश्वासाने राजेंद्र पाटील यांना राज्यमंत्रीपद दिले. सार्वजनिक आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य, वैद्यकीय शिक्षण, अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली. ती समर्थपणे राजेंद्र पाटील यांनी पेलली आहे.

कोरोनाच्या महामारीत योद्धा म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःची काळजी न करता सामान्य माणसांच्या आरोग्य सेवेला महत्त्व दिले आहे. वेळेत चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासनावर कायम वचक ठेवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात आढावा बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पावले उचलली आहेत.

आरोग्य, तसेच अन्य विभागांतील अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्र उद्दिष्टांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळवून दिली. कोरोना चाचणी केंद्र, तसेच त्यासंबंधित अधिक सोयीसुविधा यासंदर्भात महत्त्ववपूर्ण निर्णय घेतले. यंत्रमागधारकांच्या वीज दरात सवलत देण्यासाठी मदत केली. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ, वैद्यकीय उपचार दर कमी करण्यासाठी कार्यवाही केली.

कोल्हापूर येथील चित्रनगरी येथील चित्रीकरणाला ऊर्जितावस्था आणली. आशा सेविकांच्या मानधनवाढीचा पाठपुरावा केला. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाचा स्वनिधी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यास परवानगी दिली. नगर परिषद हद्दीच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेतला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेला गती देत अनेक रुग्णालयांचा समावेश केला. वैद्यकीय शिक्षण प्रवेशाचा ७०-३० चा प्रादेशिक कोटा रद्द केला. लोकसहभाग व संस्था सहभागातून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ७१ लाख रुपयांचा निधी शिरोळ तालुक्यातून दिला. राज्यात सर्वाधिक निधी देणारा हा तालुका ठरला.

इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय, उदगाव येथील ग्रामीण रुग्णालय, किणी (ता.हातकणंगले) येथील ग्रामीण रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला.

मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू करण्यासाठी निधी आणला आहे. जिल्ह्यात आरोग्यसेवा अधिक प्रभावी व्हावी यासाठी त्यांनी सतत आग्रही राहून प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

कोणताही गटतट न मानता येणाऱ्या माणसाचे काम करण्यात ते अधिक समाधान मानतात. त्यांची कोणालाही सहज भेट होऊ शकते. इतका साधेपणा त्यांनी जोपासला आहे. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी अधिक महत्त्वाची म्हणून ते झोकून देऊन काम करतात. अनेक गोरगरीब, गरजू रुग्णांना मोठ्या दवाखान्यात पाठवून मोफत उपचार करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सामाजिक सेवा अधिक उपयोगी करता येऊ शकते, हे सिद्ध करणारे आहे.

मास लीडर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

(लेखन–आयूब मुल्ला)

Web Title: Leaders who prosper through struggle: Dr. Rajendra Patil (Yadravkar)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.