ग्रामीण भागात नेतेमंडळींचा ‘राबता’

By Admin | Updated: April 12, 2015 23:58 IST2015-04-12T21:31:15+5:302015-04-12T23:58:06+5:30

मतदारांच्या भेटीसाठी गावोगावी : ‘गोकुळ’ निवडणूक; शेतकऱ्यांची यातायात नजरेला

Leaders of the rural areas' | ग्रामीण भागात नेतेमंडळींचा ‘राबता’

ग्रामीण भागात नेतेमंडळींचा ‘राबता’

दत्ता पाटील - म्हाकवे ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. ठरावधारक प्रत्येक मतदारांच्या वाड्या-वस्त्यांवर गावागावांत जाऊन भेटीगाठी घेतल्या जात आहेत. पाच वर्षे वातानुकूलित सभागृहात बसून दूध बोनस, दूध दर यासह विविध योजनांबाबत निर्णय घेणाऱ्या संचालकांसह नेतेमंडळींनी ग्रामीण भागात राबता वाढविला आहे.‘गोकुळ’ आणि जिल्हा बँक या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या दोन सहकारी संस्था आहेत. या संस्थांवर प्रभुत्व असल्यास इतर राजकारण सोपे जाते. त्यामुळे या संस्थांवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्वच नेतेमंडळी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी कोण संचालक कोणत्या तालुक्यातील आहे अन् कोण इच्छुक आहे, याबाबत काहीही माहिती नसणाऱ्या मतदारांना दस्तूरखुद्द उमेदवार घरी येऊन माहिती देत आहेत. वाढणारी चुरस आणि शर्थीचे प्रयत्न पाहून एरव्ही ‘आमदारकी नको; पण ‘गोकुळ’चे संचालक करा’ अशी मागणी का केली जाते, याची अनुभूती मतदारांना येत आहे.दरम्यान, वैरणीचे भारे आणून, शेणा-मुतात हात घालून, जनावरांचा मुलाबाळाप्रमाणे सांभाळ करून दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकरी सभासदांना निवडणुकीच्या निमित्ताने चार दिवस का असेना; पण चांगले दिवस आले आहेत. यामुळे ठरावधारक मतदारांच्या भेटीसाठी जाणाऱ्या उमेदवारांसह नेतेमंडळींना पशुपालनासाठी शेतकऱ्यांना किती यातायात करावी लागते, याची प्रत्यक्ष अनुभूती येईल, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून होत आहे.

‘कागल’मध्ये धुमशान
सत्ताधारी पॅनेलमधून संजय घाटगे गटाला वगळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांना अखेर यश आले. त्यामुळे संजय घाटगे व मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यापूर्वी माजी खासदार मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात धुमशान सुरू होते; तर आता मुश्रीफ-घाटगे यांच्यात धुमशान सुरू आहे. त्यामुळे पुन्हा कागल तालुकाच ‘गोकुळ’सह जिल्हा बँकेच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Web Title: Leaders of the rural areas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.