‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत नेत्यांची गुरुवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:06+5:302021-05-10T04:24:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीबाबत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांची ...

‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत नेत्यांची गुरुवारी बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीबाबत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी (दि. १३) बैठक होत आहे. यामध्ये संचालकांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
‘गोकुळ’च्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्तांतर केले. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले. ‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर करण्यात पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना यश आले. निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान नेत्यांसमोर राहणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच चुकीच्या प्रथांना फाटा देत कामकाजात शिस्त आणावी लागणार आहे. याबाबत, दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासोबत नेत्यांची बैठक झाली होती. यामध्ये कोणत्या दिशेने जायचे आहे, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, अध्यक्ष निवड शुक्रवारी (दि. १४) दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प कार्यालयात होणार आहे. अध्यक्ष पदासाठी विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची नावे चर्चेत आहेत. पहिल्यांदा बाहेर पडून सत्तारूढ गटाला खिंडार पाडले, त्यामुळे पहिल्यांदा डोंगळे यांना संधी मिळणार, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. विश्वास पाटील यांचा अनुभव, काम करण्याची पद्धत व त्यांनी थेट महादेवराव महाडिक यांना दिलेले आव्हान या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्याच गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. गुरुवारच्या बैठकीत सर्व संचालकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यानंतर नेते अध्यक्ष पदाचे नाव निश्चित करणार आहेत.