‘एलबीटी’ची गाडी रुळांवर
By Admin | Updated: September 19, 2014 00:30 IST2014-09-18T23:57:16+5:302014-09-19T00:30:34+5:30
४२ कोटींचा टप्पा पार : दसरा-दिवाळीनंतर जोर वाढण्याची शक्यता

‘एलबीटी’ची गाडी रुळांवर
कोल्हापूर : राज्य शासनाकडून एलबीटीला (स्थानिक संस्था कर) पर्याय देण्याची जोरदार तयारी सुरू झाल्यानंतर मार्चनंतरच्या अडीच महिन्यांत महापालिकेची घसरलेली एलबीटीची गाडी आता रुळांवर येत आहे. पहिल्या अडीच महिन्यांत फक्त १६ कोटी रुपये एलबीटी जमा झाल्यानंतर त्यानंतरच्या चार महिन्यांत एलबीटी वसुलीने २१ कोटींचा टप्पा पार करत मुद्रांक अधिभारासह एकूण ४२ कोटींपर्यंत मजल मारली आहे.
जकात हा महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत होता. महापालिकेला जकातीमधून १२५ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत होते. जकातीचा हुकमी उत्पन्नाचा स्रोत बंद करून शासनाने स्वयंमूल्यांकनावर आधारित एलबीटी ही नवीन करप्रणाली तीन वर्षांपूर्वी सुरू केली.
जकात रद्द झाल्याने फटाके वाजविणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या करप्रणालीस विरोध के ला.
पहिल्या वर्षी २०११-१२ ला ६८ कोटी, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८३, तर मागील वर्षी २०१३-१४ मध्ये ९२ कोटी एलबीटीतून महापालिकेला मिळाले. एलबीटीमधून महापालिकेला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असतानाच शासनाने एलबीटी रद्दचा घाट घातला. परिणामी, नियमित एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांनीही पैसे भरण्याकडे पाठ फिरविली होती. आता पुन्हा एलबीटीला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
एलबीटीबाबत अद्याप ठोस निर्णय प्रलंबित असला तरी महापालिकेच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यांत चांगली वसुली झाली आहे. दसरा-दिवाळीनंतर यामध्ये आणखी वाढ होईल. व्यापाऱ्यांनीही महापालिकेला एलबीटी भरून सहकार्य करावे.
- संजय सरनाईक (एलबीटी प्रमुख)
एलबीटीबाबत अद्याप ठोस निर्णय प्रलंबित असला तरी महापालिकेच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यांत चांगली वसुली झाली आहे. दसरा-दिवाळीनंतर यामध्ये आणखी वाढ होईल. व्यापाऱ्यांनीही महापालिकेला एलबीटी भरून सहकार्य करावे.
- संजय सरनाईक (एलबीटी प्रमुख)
वसुलीवर दृष्टिक्षेप
एप्रिल : ५ कोटी ५२ लाख
मे : ६ कोटी ५ लाख
जून : ६ कोटी ५९ हजार
जुलै : ९ कोटी १४ लाख
आॅगस्ट : ६ कोटी ३० लाख
१७ सप्टेंबरपर्यंत : ३ कोटी ३४ लाख