तीनशे व्यापाऱ्यांना एलबीटीच्या नोटिसा
By Admin | Updated: November 12, 2014 00:16 IST2014-11-12T00:15:08+5:302014-11-12T00:16:47+5:30
२० नोव्हेंबरची अंतिम मुदत : आठवड्यात पावणेदोन कोटी वसूल

तीनशे व्यापाऱ्यांना एलबीटीच्या नोटिसा
कोल्हापूर : राज्य शासनाकडून एलबीटीला (स्थानिक संस्था कर) पर्याय देण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच दिवाळीनंतर पुन्हा महापालिकेची घसरलेली एलबीटीची गाडी आता रुळावर येत आहे. आजअखेर ४८ कोटींपर्यंत एलबीटी वसूल झाला आहे. वसुलीची मोहीम अधिक तीव्र करीत महापालिकेने एलबीटी न भरणाऱ्या ३०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावत २० नोव्हेंबरपर्यंत अखेरची मुदत दिली. त्यानंतर या व्यापाऱ्यांची खाती गोठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.
महापालिकेचा जकातीचा हुकमी उत्पन्नाचा स्रोत बंद करून शासनाने स्वयंमूल्यांकनावर आधारित एलबीटी ही नवीन करप्रणाली तीन वर्षांपूर्वी १ एप्रिल २०११ रोजी सुरू केली. महापालिकेला जकातीमधून १२५ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत होते. राज्य शासनाचे धोरण व व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे एलबीटी जमा करणे जिकिरीचे झाले. पहिल्या वर्षी २०११-१२ साली ६८ कोटी, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८३ कोटी, तर मागील वर्षी २०१३-१४ मध्ये ९२ कोटी एलबीटीतून महापालिकेला मिळाले. आता पुन्हा एलबीटीला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. सात महिन्यांत एलबीटीतून महापालिकेला तब्बल ४८ कोटी रुपये मिळाले. एलबीटी वसुलीची मोहीम तीव्र करणार असल्याने व्यापाऱ्यांनी कटू कारवाई टाळून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)