लक्ष्मीपुरीतील बाजार पाण्यात
By Admin | Updated: July 11, 2016 01:12 IST2016-07-11T01:12:25+5:302016-07-11T01:12:25+5:30
भाजीविक्रेत्यांची तारांबळ : पावसाचे पाण्यात गटारीचे पाणी मिसळले

लक्ष्मीपुरीतील बाजार पाण्यात
कोल्हापूर : पावसाचे पाणी घुसल्याने लक्ष्मीपुरी मंडईतील आठवडी बाजारामध्ये रविवारी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. यात गटारींचे सांडपाणीही मिसळल्याने काहीशी दुर्गंधी पसरली होती. फळ व भाजीपाला मार्केट आज, सोमवारपासून बेमुदत बंद राहणार आहे. ते लक्षात घेऊन भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून पावसाच्या साचलेल्या पाण्यातच विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते.
लक्ष्मीपुरीमध्ये दर रविवारी बाजार भरतो. याठिकाणी भाजीसह धान्य, मसाला, फळे, आदी स्वरूपांतील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नेहमीपेक्षा ग्राहकांची गर्दी कमी होती. मात्र, सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे मंडईत पावसाचे पाणी साचू लागले. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने तसेच अस्तित्वात असलेल्या गटारी कचऱ्याने तुंबल्याने पावसाचे तसेच या गटारींमधील पाणी तुंबून रस्त्यांवरून वाहू लागले. पावसाच्या सातत्यामुळे या पाण्याचा लोट वाढला. यात काही विक्रेत्यांच्या भाजीचे व अन्य मालाचेही नुकसानही झाले. पाण्याचा निचरा होत नसल्याने ते रस्त्यांवरच साचून राहिले. या साचलेल्या पाण्यात सांडपाण्याचाही समावेश झाल्याने काहीशी दुर्गंधी पसरली. अशा पाण्यातच विक्रेत्यांनी स्टॉल लावून भाजीविक्री सुरू ठेवली होती. साचलेल्या दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाण्यातून वाट काढत ग्राहकांकडून खरेदी सुरू होती. पावसापासून बचावासाठी विक्रेत्यांनी प्लास्टिकचे कागद, ताडपत्र्या लावल्या होत्या. दिवसभरातील भरपावसात या ठिकाणी मंडई भरली होती. कपिलतीर्थ मार्केट, गंगावेश, आदी ठिकाणच्या मंडईतही काहीशी अशीच स्थिती दिसून आली. पावसामुळे ग्राहकांची मंडर्इंमध्ये तुरळक गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी)
बावड्यातही भर पावसात आठवडा बाजारात गर्दी
कसबा बावडा येथेही रविवारी आठवडा बाजार असतो. दिवसभर पाऊस सुरू असला तरी भाजी आणि फळ विक्रेते नेहमी प्रमाणे आले होते. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. त्यामुळे पावसातच छत्र्या, रेनकोटसह नागरिकांनी बाजार खरेदीसाठी गर्दी केली होती.