लोटे सीइटीपीत २५ लाखांचा गैरव्यवहार
By Admin | Updated: December 16, 2014 23:48 IST2014-12-16T23:14:04+5:302014-12-16T23:48:49+5:30
गुन्हा दाखल : लेखा परीक्षकाची तक्रार

लोटे सीइटीपीत २५ लाखांचा गैरव्यवहार
खेड : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या लोटे एमआयडीसीतील सीइटीपी (सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र)चे काम पाहणाऱ्या लोटे पर्शराम एनव्हायर्नमेंट प्रोटेक्शन को-आॅप़ सोसायटी लि़ , लोटे या संस्थेमध्ये २५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षक सुनील विठ्ठल सासवडकर (४७, मूळ अहमदनगर, सध्या चिपळूण) यांनी आज, मंगळवारी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे़ याप्रकरणी सीइटीपी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील शिवराम शिर्के (लोटे) आणि व्यवस्थापक नितीन सुभाष डगरे (चिपळूण) यांच्या विरोधात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील लोटे सीइटीपीचे तत्कालीन संचालक श्रीराम नारायण खरे यांनी २००४-२००५ काळात गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करीत लेखा परीक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी २७ सप्टेंबर २०१२ रोजी दिलेल्या आदेशानुसार सुनील सासवडकर यांनी या संस्थेचे लेखापरीक्षण केले आहे. हे लेखापरीक्षण याअगोरच्या लेखापरीक्षक प्रज्ञा ओक यांनी केले होते़ सासवडकर यांनी १ मार्च २०१३ रोजी या संस्थेचे फेरलेखापरीक्षण केले. यामध्ये गैरव्यवहार आणि दोष आढळून आले. त्यानुसार सासवडकर यांनी संबंधित संचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली
होती. मात्र, यातील केवळ पाचजणांनी आपले म्हणणे मांडले, तर तत्कालीन अध्यक्ष सुनील शिर्के यांना सलग पाच नोटिसा पाठविण्यात आल्या. मात्र, एकाही नोटिसीचा खुलासा ते समाधानकारक देऊ शकले नाहीत.
शिवाय या संस्थेचे व्यवहार पाहणारे नितीन सुभाष डगरे यांनाही नोटीस पाठवून ती स्वीकारली नसल्याने त्यांची असहमती लक्षात घेऊन अखेर सासवडकर यांनी आपला लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला.
या संपूर्ण प्रकरणामध्ये तत्कालीन अध्यक्ष सुनील शिर्के आणि व्यवस्थापक नितीन डगरे यांच्याविरुद्ध संचालक मंडळाला अंधारात ठेवून परस्पर खर्च झाल्याचे दाखविणे, तशी खोटी कागदपत्रे रंगवून अपहार करणे, नियमबाह्य खर्च करणे आणि संगनमताने फसवणूक करणे या आरोपाखाली खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४०६, ४०८, ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
काय आहे गैरव्यवहार?
संस्थेची रोजकीर्द, पासबुक, लेजर्स आणि धनादेशांच्या झेरॉक्स यांची तपासणी केली असता १६ लाख ६७ हजार ९६७ रुपये अनियमित खर्च आणि ८ लाख ८९ हजार २८१ रुपये नियमबाह्य खर्च मिळून २५ लाख ५७ हजार २४८ रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला आहे, असे लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले.