पोलंड निर्वासितांच्या शेवटच्या साक्षीदार हरपल्या
By Admin | Updated: November 8, 2014 00:23 IST2014-11-07T23:55:42+5:302014-11-08T00:23:22+5:30
मालती काशीकर ऊर्फ वांदा नोव्हिस्की यांचे निधन

पोलंड निर्वासितांच्या शेवटच्या साक्षीदार हरपल्या
कोल्हापूर : पोलंड निर्वासितांच्या शेवटच्या साक्षीदार असणाऱ्या मूळच्या पोलंडवासीय आाणि कायमच्याच कोल्हापूरवासीय झालेल्या मालती काशीकर ऊर्फ वांदा नोव्हिस्की यांचे ८८व्या वर्षी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात आज, शुक्रवारी दुपारी निधन झाले.
दुसऱ्या महायुद्धात पोलंडवर जर्मनीच्या नाझी फौजांनी हल्ला चढविला. त्यात पोलंडवासीयांची हत्या होण्याचा संभव होता, म्हणून तत्कालीन पोलंड सरकारने ‘सुरक्षित स्थळ’ म्हणून या पोलंडच्या नागरिकांना भारतात पाठविले. त्यांपैकी पाच हजार पोलंड नागरिकांचा एक जथ्था १९४६ मध्ये कोल्हापुरातील वळिवडे येथे निर्वासित म्हणून वसाहत करून राहिला. त्यात वांदा नोव्हिस्की यासुद्धा आपल्या कुटुंबासह आल्या होत्या. त्यावेळी काही कामानिमित्त कोल्हापुरातील वसंतराव काशीकर हे त्या ठिकाणी रोज जात असत. त्यादरम्यान त्यांची वांदा यांच्याशी मैत्री झाली. पुढे त्यांनी वांदा यांच्याशी विवाह केला. कोल्हापुरात काही वर्षे राहिल्यानंतर काशीकर कुटुंबीय कामानिमित्त मुंबईत गेले. आठ वर्षांपासून त्या कोल्हापुरात राहत होत्या.