बैलगाडी मोजतेय अखेरची घटका
By Admin | Updated: March 22, 2016 00:35 IST2016-03-21T20:58:37+5:302016-03-22T00:35:52+5:30
शेतकऱ्यांची पहिली पसंती : ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्य साधन

बैलगाडी मोजतेय अखेरची घटका
नांदगाव : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील दळणवळणावर आपली एकहाती मक्तेदारी असणारी बैलगाडी कालौघात मागे पडली आहे. अलीकडील काही वर्षांपर्यंत बैलगाडीने काही व्यवहार व्हायचे, मात्र तेही संपुष्टात आल्याने बैलगाडीने अक्षरश: अखेरचा श्वास घेतला असल्याचे सध्याचे चित्र आहे. एकेकाळी शेतकऱ्यांसह अनेकजणांची दळणवळणाला पहिली पसंती बैलगाडीला असायची. अलीकडील इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे बैलगाडी व बैलजोडी दुरापास्त झाली आहे.
बैलगाडीचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी दळणवळणाचे मुख्य साधन बैलगाडी होते. या काळात वापरात असलेल्या बैलगाड्या या पारंपरिक पद्धतीच्या होत्या. भरीव जड लाकडाची बैठक व उंची कमी असणाऱ्या या गाड्या ‘गाडा’ नावाने प्रचलित होत्या. दूरच्या पल्ल्यासाठी याचा उपयोग होत नव्हता. त्यावेळी या बैलगाडीची किंमत साधारण शंभर रुपये होती. ती तीन ते चार शेतकऱ्यांमध्ये खरेदी केली जायची. वजनाने जास्त असणाऱ्या या बैलगाडीची दुरुस्ती व देखभालीची गरज भासत असे.
वजनाने हलकी व जास्त वजन वाहून नेणाऱ्या बैलगाडीच्या निर्मितीविषयी संशोधन सुरू होऊन १८३६ मध्ये सरकारी अभियंता लेफ्टनंट गॅसफोर्ड यांनी स्वस्त व उपयुक्त बैलगाडीचा आराखडा तयार केला. प्रचलित बैलगाडीतील त्रुटी दूर करून नवीन बैलगाडीचे उत्पादन सोलापूरजवळ टेंभुर्ली येथे करण्यात आले. ही बैलगाडी कमी वजनाची (१६० पौंड) आकारमानाने मोठी व उंच होती. तिची किंमत चाळीस रुपये होती. या गाडीची बारा टन वजन वाहून नेण्याची क्षमता होती. त्यानंतर बैलगाडीमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले. ग्रामीण भागात तर बैलगाडीने आपली मक्तेदारीच निर्माण केली होती.
पूर्वी शेतकरी बैलांच्या साथीने शेती करायचे. त्यामुळे प्रत्येक घराच्या दावणीला गुरे असायची. अलीकडे आधुनिक पद्धतीने इंधनावरील वाहनांनी शेती करीत असल्यामुळे गुरांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी ज्या घरी बैलगाडी ते धनवान समजले जायचे. अलीकडे बैलगाडीला उतरती कळा लागली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे इंधनावर चालणारी वाहने आली आहेत. काही वर्षांपर्यंत ग्रामीण भागात पूर्णत: रस्तेही नव्हते. त्यामुळे बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता. अलीकडील काही वर्षांपर्यंत बैलगाडीचा उपयोग आठवडी बाजाराचा माल वाहून नेण्यासाठी केला जातो. मात्र, तीही परिस्थिती बदलली आणि सर्रास सर्वत्र मोठी वाहने वापरात येऊ लागली.
जुन्या वयोवृद्घ लोकांकडून आजही ऐकायला मिळते की, सिंधुदुर्गातही लांब पल्ल्याचा प्रवास बैलगाडीनेच करीत असत. विशेष म्हणजे बैलगाडी विवाहाच्या वरातीलाही वापरत असल्याचे अनेकजण सांगतात. त्यावेळी घडलेल्या गमतीजमतीही सांगतात. त्याशिवाय जळावू लाकूड, गवत व गुरांसाठी लागणाऱ्या गवताची वाहतूक प्रामुख्याने बैलगाडीनेच व्हायची. अनेक आठवडी बाजारासाठी माठ वाहून नेण्यासाठी व गावागावांत होणाऱ्या मेळ्यांसाठी बैलगाड्याच यायच्या. हे सर्व चित्र आता बदलले आहे. अलीकडे असे होऊ लागले आहे की, बैलगाडीसाठी लागणारी बैलजोडी सांभाळण्यास कोणीही उत्सुक नाही.
बैलजोडीला व बैलगाडीला येणारा खर्च पाहता इंधनावर चालणारे वाहनच अनेकजण पसंत करतात. पॉवर टिलर आल्याने गुरे राखणे कमी झाले आहे. शिवाय बैलगाडीने दळणवळण तितके वेगात होत नाहीे. त्याला पर्याय म्हणून स्वत:च्या मालकीचे किंवा भाड्याने रिक्षा, टेंपो या वाहनांनी वाहतूक सुरू झाली. (वार्ताहर)
आठवणी कालबाह्य
कोकणातील बैलगाडीचा अनुभव मात्र प्रत्येकाला सुखावह असाच आहे. बैलजोडीच्या गळ्यातील घुंगुराचा मंजुळ आवाज, चाकांची करकर, बैलगाडी हाकताना बैलांना विशिष्ट पद्धतीच्या आवाजात हाक देणे, बैलाच्या पायाला मारलेल्या नालांचा घोड्याच्या टापांसारखा होणारा आवाज, कंदिलाचा मंद प्रकाश, चाबकाची सळसळ आणि बैलगाडीच्या मागे मागे उड्या मारत धावणारी लहान मुले या साऱ्या आठवणी कोकणातील बैलगाडीमध्ये अनुभवास मिळतात. परंतु, हळूहळू या आठवणी कालबाह्य होऊ लागल्या आहेत.