शहीद राजेंद्र तुपारेंना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 01:43 IST2016-11-09T01:46:25+5:302016-11-09T01:43:27+5:30
कार्वेत अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती

शहीद राजेंद्र तुपारेंना अखेरचा निरोप
कोल्हापूर/चंदगड : अमर रहे... अमर रहे, शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना मजरे कार्वे (ता. चंदगड ) येथे लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी लष्कराच्यावतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
शहीद तुपारे यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, बेळगावचे आमदार संजय पाटील, माजी आमदार भरमूअण्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मराठा लाईट इन्फन्ट्री युनिटचे ब्रिगेडीअर प्रवीण शिंदे यांनीही शहीद राजेंद्र तुपारे यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी शहीद राजेंद्र तुपारे यांचे वडील नारायण तुपारे, पत्नी शर्मिला, पुत्र आर्यन आणि वैभव यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
शहीद तुपारे यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव मंगळवारी सकाळी ८.३० वाजता बेळगाव (पान ११ वर)
येथील मिलीटरी कँपमधून सजविलेल्या वाहनातून त्यांच्या मूळ गावी मजरे कार्वे येथे आणण्यात आले. यावेळी गावात संपूर्ण गावात तुपारे यांच्या श्रद्धांजलीचे फलक, भगव्या पताका, तर गल्लीमध्ये रांगोळी व फुलांचा सडा घालण्यात आला होता. गावाच्या प्रवेशद्वारावर लाडक्या सुपुत्राचे पार्थिव येताच ‘राजेंद्र तुपारे’ अमर रहे..अमर रहे अशा घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर महिलांनी पार्थिवाचे औक्षण केले. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी पार्थिव घरी नेण्यात आले. वडील नारायण तुपारे, आई शांता, पत्नी शर्मिला, मुले आर्यन आणि वैभव, भाऊ अनंत व संदीप तसेच नातेवाईकांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यानंतर गावातून शहीद तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर त्यांंचे पार्थिव महात्मा फुले हायस्कुल व गुरुवर्य म.भ.तुपारे ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या खास शामियानात उपस्थित जनसमुदायाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी लष्करी जवानांनी मानवी साखळी तयार करुन शहीद तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहीद तुपारे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज शहीद तुपारे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या हाती लष्कराच्या वतीने अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच कुटुंबियांनी शहीद तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.
यानंतर फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर पार्थिव आणण्यात आले. यावेळी वडील नारायण तुपारे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन सुपुत्रास अखेरची मानवंदना दिली. लष्कराच्या १४ जवानांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहीद तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर शहीद तुपारे यांचे पुत्र आर्यन व बंधृ अनंत यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला.
यावेळी अमर रहे... अमर रहे शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा शोकाकुल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुभाष सासने, मेजर महेंद्र घाग, व्हाईट आमीर्चे प्रमुख अशोक रोकडे, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील, राजेश पाटील, विजय देवणे, मजरे कावेर्चे सरपंच अशोक कांबळे यांच्यासह तालुक्यातील माजी सैनिक, जि. प. व पं. स.चे सदस्य यांच्यासह शासकीय व लष्करी अधिकारी, जवान आणि बेळगाव, कोल्हापूर परिसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी लष्करी व पोलीस जवानाबरोबरच व्हाईट आर्मीच्या जवानांनीही मोलाचे योगदान दिले.
शासनाची १५ लाखांची मदत
शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या हौतात्म्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने १५ लाखाचा निधी जाहीर केला आहे. याबाबतचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आलेला संदेश यावेळी जाहिर करण्यात आला.
पाकिस्तानी ध्वजाचे दहन
‘कुदनूर येथील तरुणांनी ‘जला दो..जला दो..पाकिस्तान जला दो..पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा संतप्त व तीव्र घोषणांनी कुदनूर बसस्टॉपवर पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करून निषेध नोंदविला.
तालुका बंद ठेवून श्रद्धांजली
तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठा, विविध संस्थांनी बंद पाळून लाडक्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली.