शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:38+5:302021-01-17T04:21:38+5:30
कागलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण प्रारंभ कागल : मतदारसंघातील शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत ...

शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
कागलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण प्रारंभ
कागल : मतदारसंघातील शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांना ही लस बाजारात उपलब्ध झाली पाहिजे. गोरगरिबांना मोफत मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचे समारंभपूर्वक वितरण मंत्री मुश्रीफ यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता पाटील यांच्याकडे केले. यावेळी प्रांताधिकारी रामहरी भोसले , तहसीलदार शिल्पा ठोकडे, डाॅ. सुनीता पाटील, मुख्याधिकारी पंडित पाटील, गटविकास अधिकारी संस्था, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे यांनी लिहिलेल्या पोस्ट कोविड या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विविध शासकीय अधिकारी तसेच भय्या माने, प्रवीणसिंह पाटील, सभापती पूनम मगदूम, उपसभापती अंजना सुतार, जि. प. सदस्या शिवानी भोसले प्रमुख उपस्थित होते.
यावेळी भय्या माने म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना योद्धयांबरोबरच मंत्री हसन मुश्रीफ नेहमीच अग्रभागी राहिले. या लसीची निर्मिती ही एक क्रांतीच आहे. डॉ. योगेश साळे म्हणाले, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारा ही दर्जेदार व गुणवत्तापूर्वक लस निर्माण झाली आहे. या लसीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी बल्लाळ यांनी केले.
चौकट
○ कागल तालुका कोरोनामुक्त...
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आज कोरोना प्रतिबंधक लस आली आणि कागल तालुक्यात सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, ही आनंददायी योग आहे. तालुक्यात २३२० कोरोना पाॅझिटिव्ह सापडले. त्यापैकी सत्तर जणांना प्राण गमवावे लागले. उर्वरित सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तरीही काळजी घेऊया.
फोटोओळी
कागल येथील ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा बॉक्स अधिष्ठाता डॉ. सुनीता पाटील यांच्याकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुपूर्द केला. यावेळी भय्या माने, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रवीणसिंह पाटील उपस्थित होते.