शेवटच्या पाच मिनिटांत सामना हरलो
By Admin | Updated: January 15, 2015 00:11 IST2015-01-15T00:09:32+5:302015-01-15T00:11:43+5:30
यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...

शेवटच्या पाच मिनिटांत सामना हरलो
के एमसीचा संघ प्रथमच काश्मीर येथे अखिल भारतीय महापालिका संघांच्या स्पर्धेसाठी गेला होता. काश्मीर येथील संघाविरोधात सामन्यात खेळताना शेवटच्या पाच मिनिटांत आमच्याच संघाविरोधात स्वयंगोल झाला आणि आम्ही सामना हरलो. यात मला काश्मीरच्या खेळाडूचा दात लागला... असा किस्सा महाकाली तालीम मंडळ व केएमसी संघाचे माजी फुटबॉलपटू नेताजी पाटील सांगत होते.सत्तरीच्या दशकात केएमसीचा संघ काश्मीर येथे गेला होता. या सामन्यात मी आमच्यावर स्वयंगोल झाल्याने सतर्कच होतो. पुन्हा आक्रमण झाल्याने मी चेंडू बाहेर काढताना काश्मीर संघाच्या आघाडीच्या खेळाडूचा दात मला लागला. डॉक्टरने मैदानावरच हातावर शस्त्रक्रिया करीत टाके घातले. तरीही मी हा सामना खेळलो. आम्ही हरलो; मात्र हा क्षण माझ्या कायम ध्यानात राहिला. सांगलीमध्ये त्या काळात ‘आरवाडे चषक फुटबॉल स्पर्धा’ प्रसिद्ध होत्या. मी महाकाली तालीम संघाकडून खेळत होतो. आमचा सामना शिवाजी तरुण मंडळाविरोधात पडला. तीन दिवस आमची बरोबरीच राहिली. त्यामुळे शेवटच्या क्षणात आमच्या खेळाडूने गोल नोंदवीत सामना १-० असा जिंकला.
‘शिवाजी’कडून अरुण नरके, चंदू साळोखे हे खेळत होते. त्याकाळी सलग नऊ ते दहा वर्षे कोल्हापुरातील स्पर्धांमध्ये आम्ही विजयीच राहिलो होतो. शाहू स्टेडियम येथे डिचोला गोवा विरुद्ध केएमसी असा अंतिम सामना होता. मात्र, आमची आंतर महापालिका स्पर्धेसाठी कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) येथे निवड झाली; त्यामुळे आम्ही कलकत्त्याला निघून गेलो आणि डिचोली संघास बोरगावकर चषक बहाल करण्यात आला. माझ्याबरोबर प्रभाकर मगदूम, प्रभाकर सुतार, पंडित पोवार, दिलीप सरनाईक, मंगल शिंदे, भाऊ सरनाईक, संपत मंडलिक, दिलीप माने, बाजीराव मंडलिक; ‘शिवाजी’कडून दिलीप कोठावळे, ‘एस.टी.’चे बाबू घाटगे, रघू पिसे, आदींबरोबर मला खेळण्याचा योग आला. त्याकाळी मला रोव्हर्स कप खेळण्यास मिळाला. मी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विविध मैदानांत खेळलो. हा मान मला केवळ फुटबॉलमुळे मिळाला.
आजच्या मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी सर्व सोयीसुविधा मिळत आहेत. मात्र त्यांना खेळात म्हणावी तशी चमक दाखविता येत नाही. याला सरावातील अनियमितपणा जबाबदार आहे.
- शब्दांकन : सचिन भोसले.