कळंब्यातील सांडव्यानजीकचा पूल मोजतोय शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:40+5:302021-08-21T04:27:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळंबा : कळंबा तलावाच्या हद्दीत सांडव्यासमोरील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. या पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे ...

कळंब्यातील सांडव्यानजीकचा पूल मोजतोय शेवटची घटका
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : कळंबा तलावाच्या हद्दीत सांडव्यासमोरील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. या पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे कमकुवत बनले आहेत. गतवर्षी व नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव सांडव्यावरून दीड फुटाने ओसंडून वाहू लागल्याने पाण्याचा मोठा विसर्ग पुलाखालून झाला. त्यामुळे पुलाच्या एका बाजूचा भराव वाहून गेला. पुलाच्या भिंती कमकुवत झाल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतो. वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचे ना सर्वेक्षण झाले ना मजबुतीकरण झाले. पुलाची उंची कमी असल्याने प्रतिवर्षी तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला की पुलावर पाणी येते. तलावातून वाहून येणारा कचरा, जलपर्णी पुलाच्या भिंतीत अडकल्याने जोरदार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पुलावर ताण पडतो. तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला की बऱ्याचदा पूल कंप पावत असल्याची अनुभूती नागरिकांनी घेतली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचा भराव खचू लागल्याने पूल कमकुवत बनला आहे.
कळंबा, पाचगाव, कंदलगाव, गिरगाव आदी मार्गांवर या पुलावरून कायमस्वरूपी वाहतूक सुरू असते. पुलाची रुंदी कमी असली तरी अवजड वाहतूक जास्त होत असल्याने पुलाची देखभाल, दुरुस्ती गरजेची बनली आहे. पुलाचे तत्काळ सर्वेक्षण करून मजबुतीकरण न झाल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तत्काळ या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
प्रतिक्रिया सरपंच सागर भोगम
तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा मोठा विसर्ग पावसाळ्यात होतो. अलीकडे पुलावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुलाची उंची कमी असून, स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरण तत्काळ होणे क्रमप्राप्तच आहे. संबंधित प्रशासनाने या प्रश्नी तत्काळ लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे.
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ : कळंबा तलावाच्या सांडव्यासमोरील पुलाचा भराव खचला असून, जीर्ण पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.