हुपरीतील विहिरी मोजताहेत अखेरच्या घटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:40+5:302021-06-23T04:16:40+5:30

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी ...

The last factor is counting the wells in Hoopari! | हुपरीतील विहिरी मोजताहेत अखेरच्या घटका!

हुपरीतील विहिरी मोजताहेत अखेरच्या घटका!

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका! गेली ८२ वर्षे शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. विहीर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असून विहिरीचे संपूर्ण बांधकामही ढासळत चालले आहे. परिणामी विहिरी मुजतात की काय, अशी परिस्थिती पाहवयास मिळत आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी शहराची जीवनदायिनी ठरलेल्या या दोन विहिरींचे जतन करण्यासाठी नगरपरिषदेने पुढे येण्याची गरज आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी १९७६ पर्यंत हुपरी व संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई असायची. १९७६ मध्ये हुपरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरू झाली अन् परिसरातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा हुपरीशी विविध कारणांनी सातत्याने संपर्क येत असे. तत्कालीन गाव कामगार पोलीस पाटील यडगोंडा पाटील यांनी सन १९३९ मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब गावानजिक असलेल्या म्हेतरमळ्यामध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी दोन विहिरीची खोदाई करण्याबरोबरच त्यांचे भक्कम बांधकामही करून घेतले. त्यावेळेपासून आजपर्यंत सलग ८२ वर्षे अव्याहतपणे या विहिरीतून शहरातील गावभागाला पाणीपुरवठा होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांच्या प्रयत्नातून दहा वर्षांपूर्वी दूधगंगा नदीवरून शहरासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. तेव्हापासून या विहिरीचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. नगरपरिषदेच्या माध्यमातून या योजनेतून शहराला स्वच्छ व भरपूर पाणीपुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधी बरोबरच शहरवासीयांचेही या विहिरींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा अनुभव येत आहे. परिणामी गेल्या ८२ वर्षांपासून शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असून शेवटच्या घटका मोजत असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे.

फोटो ओळी -हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका!

Web Title: The last factor is counting the wells in Hoopari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.