कोल्हापूर : जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान होत असलेल्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक, तसेच इतर कार्यक्रमांदरम्यान लेझर लाइटच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा आदेश दिला असून, हा नियम मोडल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकांमध्ये गणेशोत्सव मंडळांकडून लेझर, लाइटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. गतवर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीच्या वेळी, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाइट पडल्याने, काही व्यक्तींचा डोळ्याचा पडदा फाटला होता, तर काहींच्या बुब्बळाला इजा झाल्या होत्या. डोळ्यांवर उपचार करणारे ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीनेही लेसर लाइट्सवर बंदी घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.कोल्हापुरात गणेशोत्सव मिरवणुकीत गतवर्षी दोन गंभीर घटना घडल्यानंतर कायद्याचे डोळे उघडले होते. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर धोका लक्षात घेऊन गतवर्षी प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचनाही दिल्या होत्या.जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश जारी करताच ॲक्शन मोडवर आलेल्या पोलिसांनी मिरवणुकीत लेसर लाइट्स आणि डीजे लाइटचा वापर करणाऱ्या सुमारे ३०० मंडळांवर कायदेशीर कारवाई केली. लाइट्स आणि ध्वनियंत्रणा पुरविणाऱ्या संघटनेसही पोलिसांनी बंदी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गणेशोत्सवात कोल्हापूमध्ये लेसर लाइटला बंदी, नियम मोडल्यास थेट फौजदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:59 IST