माणूस पाहून बदलते पोलिसांची भाषा

By Admin | Updated: July 22, 2014 22:51 IST2014-07-22T22:41:31+5:302014-07-22T22:51:07+5:30

पालीस ठाण्यातील वर्तणूक : गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या इंजेक्शनच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने घेतला धांडोळा

The language of changing poles is a man | माणूस पाहून बदलते पोलिसांची भाषा

माणूस पाहून बदलते पोलिसांची भाषा

राजीव मुळ्ये / दत्ता यादव - सातारा
‘पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे. अरेरावी करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही. अशा पोलिसांवर कठोर कारवाई करा,’ अशा शब्दांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. या आदेशामुळं काही फरक पडणार आहे का? मुळात पोलीस ठाण्यात येणाऱ्या कुणाला कशी वागणूक दिली जाते, याचा धांडोळा घेतला असता, पोलीस बहुरंगी भूमिका वठवताना दिसतात. प्रत्येक प्रवेशात त्यांचे डायलॉगही बदलतात. कसे ते पाहा...

पोलीसदादा जेव्हा वेटर बनतो...
एखादा राजकीय नेता पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला पहिल्यांदा बसायला खुर्ची दिली जाते. ‘चहा घेणार, की थंड,’ असा अदबीनं सवाल विचारला जातो. बेल वाजवून अधिकारी लगेच कर्मचाऱ्याला आत बोलावून घेतात. ‘जा रे, साहेबांना चहा घेऊन ये,’ असं फर्मान सोडलं जातं. बिचारा कर्मचारी हिरमुसल्या चेहऱ्याने बाहेर पडतो. खिशात पैसे नसतील तर ओळखीच्या कर्मचाऱ्याकडून उसने पैसे घेऊन तो चहा किंवा थंड घेऊन येतो. साहेबांच्या केबिनमध्ये आल्यावर कर्मचारी स्वत: एखाद्या वेटरसारखा राजकीय नेत्यासमोर आणि त्याच्या कार्यकर्त्यांसमोर चहाचे कप ठेवतो. साहेबांच्या ‘गप्पा’ झाल्यावर पुन्हा साहेब बेल वाजवतात. ‘जी साहेब,’ असे म्हणून कर्मचारी आतमध्ये येतो. ‘अरे, हे मोकळे कप उचल ना,’ असं फर्मान सुटतं. बिचारा कर्मचारी पुन्हा मोकळे कप घेऊन बाहेर जातो. फक्त कप विसळणेच बाकी राहते. अन्यथा प्रतिष्ठित पाहुण्यासाठी वेटरचीच सर्व कामे ‘जनतेचा रक्षक’ करीत असतो. अपवादात्मक एखादा अधिकारी कर्मचाऱ्याला केवळ चहा सांगण्याचे फर्मान सोडतो. त्यावेळी हॉटेलवाला राजकीय नेत्याला चहा आणून देतो. हवालदारालाही प्रतिष्ठा आहे, हे अशा मोजक्याच अधिकाऱ्यांना मान्य आहे.

‘प्रोफेशनल’ आंदोलनकर्ते ‘पाहुणे’च
समाजात अनेकांची ‘आंदोलनकर्ता’ अशी ओळख असते. मोठ्या कष्टाने ती ‘कमावलेली’ असते. वारंवार आंदोलने करणे हा काहींचा ‘व्यवसाय’ बनला आहे. चळवळींवरचा लोकांचा विश्वास उडविणारी ही मंडळी पोलीस ठाण्यात ‘व्हीआयपी ट्रीटमेन्ट’ अनुभवतात. ‘काय मग... आज कुठे करताय आंदोलन,’ अशा सोज्वळ प्रश्नाने संवाद सुरू होतो. ‘आज आमच्याबरोबर दोनशे-तीनशे माणसं आहेत,’ तुम्ही पोलीस बंदोबस्त ठेवा,’ अशी मागणी आंदोलनकर्ता थाटात करतो. प्रत्यक्षात आंदोलनस्थळी मात्र चार-दोन ‘कार्यकर्ते’च असतात. पण आयत्या मिळालेल्या बंदोबस्तामुळे त्याला आपला ‘दबदबा’ उगीचच वाढल्याचा भास होतो. पोलीसही त्याची ही इच्छा पूर्ण करतात.

‘बाहेरच भेटू...’

एखादा कुप्रसिद्ध गुंड पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. ‘काय राव, काय चाललंय तुमचं? कुठे असतोस तू आता?’ असे ‘सवाल-जबाब’ सुरू होतात. ‘मागच्या केसमध्ये तुला जामीन लवकर मिळाला नाही का?’ अशा चौकशाही होतात. विशेषत: अशा गुंडांना पोलीस ठाण्यात जास्त वेळ बसवून ठेवलं जात नाही. कुणी पाहिलेच तर पंचाईत नको, म्हणून ‘आपण बाहेरच भेटू,’ असे सांगून त्याची बोळवण केली जाते. गुंडाला फोन करताना पोलीस प्रचंड खबरदारी घेतात. स्वत:च्या मोबाइलवरून कधीच कोणत्या गुंडाला फोन करत नाहीत. त्यासाठी शक्यतो दुसऱ्या कुणाच्यातरी नावाचं सिमकार्ड घेऊन काही पोलीस सतत गुंडांच्या संपर्कात राहतात. चलती असलेल्या गुंडाशी वागण्याची रीत दबदबा हरवलेल्या गुंडाच्या तुलनेत कितीतरी चांगली असते.

महिला तक्रारदार नशीबवान
तक्रार देण्यासाठी आलेल्या महिला मात्र आता नशीबवान ठरल्या आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत तक्रार नोंदवून घेतली जात नाही, हा मुद्दा दिल्ली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभर चर्चिला गेला. त्यानंतर अत्याचारविरोधी नवा कायदा अस्तित्वात आला. पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची तक्रार नोंदवून घेतलीच पाहिजे, असा नियम झाल्यामुळे महिलांना पूर्वीसारखी अपमानास्पद वागणूक आता मिळत नाही, असे दिसून येते. महिला तक्रारदाराशी उद्धट वर्तन केल्यास आणि संबंधित महिलेने तसे सांगितल्यास पोलिसांना कारवाईस सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांशी अत्यंत अदबीने वागण्याची सवय पोलिसांना आता लागली आहे.


साहेब... मी आरोपी नाही, तक्रारदार आहे !

एखाद्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सामान्य नागरिक आल्यास आधी बराच वेळ त्याच्याकडे कुणी लक्षच देत नाही. लक्ष गेलंच तर ‘ए, काय पाहिजे?’ असा प्रश्न खेकसून विचारला जातो. वयस्क माणसालाही अरे-तुरे करून बोलावले जाते. ‘नाव काय? कुठले साहेब पाहिजेत? काय काम आहे?’ हे सवालही उपकारकर्त्याच्या भावनेतून विचारले जातात. तक्रार देण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकाला आपणच काहीतरी मोठा गुन्हा केला आहे, असे वाटू लागते. मोठ्या आवाजात पोलिसाने प्रश्न विचारल्यामुळे तो अक्षरश: गांगरून जातो. त्याची बोलती बंद होते. हळू आवाजात तो सांगू लागतो, तेव्हा आणखी मोठ्या आवाजात पोलीस ‘तुला कळतंय का, मोठ्याने बोल,’ असं खडसावतात. याउलट एखादा सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात मोठ्या आवाजात बोलू लागला, तर मात्र ‘ए, आवाज खाली घे,’ असं सुनावलं जातं. ‘पोलीस स्टेशन आहे का धर्मशाळा?’ असाही सवाल केला जातो. यापेक्षा भयानक म्हणजे, गुन्हे दाखल असलेल्या संशयितांना पोलीस ठाण्यात रोज हजेरी असते. या संशयितांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर अरेरावीची भाषा वापरून अपमानित केले जाते. न्यायालयात गुन्हेगार सिद्ध होण्यापूर्वीच पोलीस या सर्व संशयितांना अगोदरच गुन्हेगार ठरवतात आणि तशी वागणूक देतात. संशयितांच्या पोलिसांबाबत अनेक तक्रारी असतात; मात्र त्या नेमक्या कोणाकडे करायच्या, हे त्यांना कळत नाही.

जोडगोळीचा ‘चोरीचा मामला’

महाविद्यालयीन युवक-युवतींना आक्षेपार्ह वर्तन करताना पकडल्यास त्यांना बोलायलाही तोंड नसते. अशा वेळी मुलीला खुर्चीवर बसविले जाते, तर मुलाला मात्र खाली जमिनीवर बसविले जाते. थोडी दमदाटी केल्यास मुलगी घडाघडा बोलू लागते. मोबाइल नंबरही मुली खरे देतात. मुले मात्र चुकीचे मोबाइल नंबर पोलिसांना देतात. काही वेळा मित्रांचा नंबर वडिलांचा नंबर म्हणून देतात. कधीही न ऐकलेल्या शिव्या मुलांना पोलीस ठाण्यात ऐकाव्या लागतात. मुलींना मात्र सभ्यतेची वागणूक दिली जाते. आपले प्रकरण घरी कळेल, या दबावाखाली मुलगा-मुलगी दोघेही असतात. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावले जाते. समज देऊन सोडून दिले जाते. मात्र, दरम्यानच्या काळात विशेषत: मुलाला खूपच त्रास होतो. त्याला अशा ठिकाणी बसविले जाते, जिथून तो जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाला दिसू शकतो. पुढे अनेक दिवस त्याला नजर चुकवत फिरावे लागते.

Web Title: The language of changing poles is a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.