मोबाईलने डिसकनेक्ट केली लॅँडलाईन

By Admin | Updated: December 9, 2014 23:55 IST2014-12-09T23:28:34+5:302014-12-09T23:55:33+5:30

दूरध्वनी कनेक्शन घटले : जिल्ह्यात दर महिन्याला होतात सोळाशे कनेक्शन बंद

Landline Disconnected by Mobile | मोबाईलने डिसकनेक्ट केली लॅँडलाईन

मोबाईलने डिसकनेक्ट केली लॅँडलाईन

संदीप खवळे - कोल्हापूर -दूरसंचार क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेल्या दूरध्वनीचे अस्तित्वच आता आता नाममात्र राहण्याची वेळ आली आहे. मोबाईलचा वाढता वापर, त्यातील नवीन तंत्रज्ञान आणि इंटरनेटची सुविधा यामुळे देशातील लँडलाईन कनेक्शनना घरघर लागली आहे़ लॅँडलाईन कनेक्शन बंद होण्याचा वेग इतका आहे की, येत्या काही वर्षांत लॅँडलाईनचा वापर केवळ कार्यालये आणि ब्रॉडबॅँड कनेक्शनची आवश्यकता असलेल्या ठिकाणीच होण्याची चिन्हे आहेत. या बदलाला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नाही...
गेल्या तीस वर्षांत एस़टी़डी़, कॉईन बॉक्स, तसेच घरातील दूरध्वनी या मार्गांनी टेलिफोनचा वापर व्हायचा़ शहर असो वा ग्रामीण दूरध्वनीमुळे तो जोडला गेला होता. जागतिकीकरणानंतर खासगी कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आणि दराची स्पर्धा वाढून ग्राहकांचा फायदा झाला़ यामुळे दूरध्वनींची संख्या वाढत गेली़; पण २००५ नंतर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे ही संख्या कमी होत गेली़ ही बाब दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बीएसएनएल’च्या नोव्हेंबर २०१४ च्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अहवालात दिसून येते़ बीएसएनएल दूरध्वनी कनेक्शनची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या नोव्हेंबर २०१४ अखेरीस कमी होऊन १०१५५२ पर्यंत आली आहे़ इतर कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ‘बीएसएनएल’ने दूरध्वनीबरोबरच ब्राँडबॅँड तसेच ‘तरंग’ सेवाही सुरू केली आहे़ यातील ब्राँडबॅँड कनेक्शनमध्ये मार्च २०१४ च्या तुलनेत फारशी घट नाही़ जिथे केबल पोहोचू शकत नाहीत, अशा दुर्गम भागात ‘बीएसएनएल’ने तरंग सेवा सुरू केली होती़ या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता़; पण मोबाईल टॉवरने ‘तरंग’ सेवेलाही खो दिला आहे़ तरंग कनेक्शनही नऊ हजारांवरून साडेसहा हजारांच्या आसपास आलेली आहेत़
मोबाईलवरील इंटरनेट सेवा, तंत्रज्ञानातील स्पर्धेमुळे दूरध्वनींची संख्या झपाट्याने कमी होत आहे़ दर महिन्याला सरासरी सोळाशे कनेक्शन्स बंद होत आहेत़ त्यामुळे दूरध्वनीचा वापर हा कार्यालये आणि ब्राँडबॅँडपुरताच मर्यादित होऊन दूरध्वनीचा खणखणाट इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीस वर्षांत ‘बीएसएनएल’ने दूरध्वनी सेवा पोहोचविण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ दूरध्वनी जोडणीसाठी आवश्यक असलेली आॅप्टिकल फायबर केबल व अन्य साधनसामग्री यांसाठी अब्जावधी रुपये खर्च केले आहेत़ बीएसएनएलची जिल्ह्यात ३०८ एक्स्चेंज आहेत. याच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भाागातील लोकांना दूरध्वनीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे; डिसकनेक्ट होणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे.
दरम्यान, केंद्र शासनाने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतींना ब्राँडबॅँड कनेक्शन देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हेच आशादायी चित्र आहे.


दर महिन्याला सरासरी सोळाशे दूरध्वनी कनेक्शन बंद होत आहेत. मोबाईलचा वाढता वापर, बाजारातील स्पर्धा ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मोबाईलने लॅँडलाईन कनेक्शनला एक मोठे आव्हानच उभे केले आहे. मोबाईलचा वाढता वापर ओळखून दूरध्वनीसाठी लागणाऱ्या आॅप्टिकल केबलची पुरेशी निर्मितीही कंपन्यांकडून होत नाही.
- एस. डी. हजारे,
सहायक महाप्रबंधक (योजना), बीएसएनएल, कोल्हापूर.

Web Title: Landline Disconnected by Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.