जमीन मोजणीच्या गाडीला सुसाट वेग
By Admin | Updated: May 23, 2015 00:32 IST2015-05-22T22:32:53+5:302015-05-23T00:32:22+5:30
मुंबई-गोवा महामार्ग : जिल्ह्यात चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा

जमीन मोजणीच्या गाडीला सुसाट वेग
प्रकाश वराडकर -रत्नागिरी--मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जमिनीच्या मोजणीची गाडी गेल्या दीड महिन्यात सुसाट वेगाने धावत आहे. जिल्ह्यात जमीन मोजणीच्या १०२ पैकी ८३ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ८० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील जमीनमोजणीचे काम ७ जून २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून महामार्ग विभागाला आदेश होते. त्यानुसार जिल्ह्यातील यंत्रणेने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १०२ ठिकाणी जमीन मोजणी होणार आहे. दीड महिन्यापूर्वी त्यातील केवळ ६ ठिकाणीच मोजणी पूर्ण झाली होेती. परिणामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल २०१५ पासून चौपदरीकरण काम सुरू करण्याचा जाहीर केलेला मुहूर्त हुकला होता. जमीन मोजणीचे केवळ सहा टक्केच काम पूर्ण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली होती.
दीड महिन्यापूर्वी संबंधित विभागांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने ७ जून २०१५पूर्वी मोजणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभाग व भूमी अभिलेख विभागाने जोरदार मोहीम हाती घेत महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन मोजणीचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात पूर्ण केले आहे. रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यात जमीन मोजणीचे हे काम ९७ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या ४२०० कोटी खर्चाच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकल्पाच्या पूर्णत्त्वासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करता यावे म्हणून गडकरी यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची डिसेंबर २०१४ मध्ये बैठकही घेतली होती. मात्र, त्यानुसार ३१ मार्चपर्यंत मोजणीचे काम दुर्लक्षितच राहिले होते. गेल्या दीड महिन्यात या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. केवळ राजापूर तालुक्यातच सर्वाधिक भूसर्व्हेक्षण बाकी राहिले आहे.
रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये सर्वाधिक काम पूर्ण
जिल्ह्यातील खेड तालुक्यात रस्त्याच्या जागेसाठी मोजणीची २५ ठिकाणे असून, त्यातील ११ ठिकाणी मोजणी पूर्ण झाली आहे. चिपळूण तालुक्यातील मोजणीच्या १४पैकी १२ ठिकाणी मोजणी झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील २३ पैकी २२ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. म्हाबळे येथील मोजणी व्हावयाची आहे. रत्नागिरी तालुक्यात १२ पैकी ११ ठिकाणी मोजणी झाली आहे. खानू येथील मोजणी आक्षेपामुळे थांबली आहे. राजापूरमधील १७ पैकी १५ ठिंकाणी मोजणी पूर्ण झाली आहे. लांजा तालुक्यातील ११पैकी ९ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ठिकाणी येत्या ७ जूनपूर्वी मोजणी पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केला आहे.