बावडा पुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST2021-05-07T04:23:46+5:302021-05-07T04:23:46+5:30
नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन ...

बावडा पुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास सुरुवात
नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन झाले, तेव्हाच या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देणे गरजेचे होते. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीचा मोबदला द्या आणि मगच पुलाचे काम सुरू करा, असा ठेका धरला होता. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक बांधकामने पुलाचे काम हाती घेतले. तब्बल चार वर्षांनंतरही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने बैठक घेऊन भूसंपादनाची रक्कम त्वरित देण्याचे आदेश काढले होते.
सध्या ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांचे जमिनी खरेदीबाबत रजिस्टर ऑफिसला सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांच्यात दस्त करण्यात येऊ लागले आहेत. रजिस्टर ऑफिसला कोरोनामुळे दररोज मर्यादित संख्येने दस्त केले जात असल्याने सर्व शेतकऱ्यांचे दस्त होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना कोरोना लस घेतल्याचा व कोरोनाची टेस्ट केल्याचा पुरावाही द्यावा लागत असल्याने या प्रक्रियेला काहीसा विलंब होत आहे.
चौकट : जमिनी रीतसर ताब्यात द्या
पुलाच्या ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर आपल्या ताब्यात द्याव्यात, मगच आपण दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात करू, अशा मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. ठेकेदाराच्या ताब्यात जमिनी वेळेवर न दिल्यास काम बंद होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची आता शेतकऱ्यांबरोबर दस्त खरेदी करण्यासाठी घाई उडाली आहे.
सध्या या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेच्या आत टाकून पूर्ण करावयाचा आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराची तयारी सुरू आहे. पाचवा स्लॅब पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात होणार आहे.
फोटो ०६ : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराने तयारी सुरू ठेवली आहे.
(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )