भुयेवाडीत रोख रकमेसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:26+5:302021-06-19T04:17:26+5:30
कोल्हापूर : भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरवनाथ नागरी पतसंस्थेत रोख रकमेसह साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल ...

भुयेवाडीत रोख रकमेसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास
कोल्हापूर : भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरवनाथ नागरी पतसंस्थेत रोख रकमेसह साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत परशुराम बापूसाहेब वाडकर (वय ५०, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी वाडकर हे या पतसंस्थेत व्यवस्थापक आहेत. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि. १७) नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.१८) सकाळी पावणेदहा या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद पतसंस्थेचे मीटिंग हाॅलमधील खिडकीचे ॲंगल वाकवून आत प्रवेश केला. बनावट चावीचा वापर करून पतसंस्थेचा मुख्य दरवाजा उघडून आतमधील कॅशियरच्या केबीनमध्ये प्रवेश करून तिजोरीचे लोखंडी दार उचकटले. त्यातील लाॅकरमधील १ लाख ८६ हजार १८१ रुपयांसह २० ग्रॅम सोन्याचे गंठण, सात ग्रॅम सोन्याची चेन आणि दहा ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण ३ लाख ४७ हजार ६८६ रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला. चोरीच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी करून तपासाबद्दल सूचना दिल्या. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविला असून तपास अंमलदार माने करीत आहेत.