उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याचे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास : सीपीआर परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:00+5:302021-08-21T04:28:00+5:30
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याच्या मोटारसायकलला अडकवलेली सुटकेस व त्यातील १ लाख ५८ हजार रुपये किमतीची ...

उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याचे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास : सीपीआर परिसरातील घटना
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याच्या मोटारसायकलला अडकवलेली सुटकेस व त्यातील १ लाख ५८ हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि.१८) सकाळी ११.३० ते दीड वाजेच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद कोमल आशिषकुमार पाटील (वय २६, रा. भडगाव, ता. कागल) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी या आपल्या पतीसह मुलावर उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात बुधवारी (दि.१८) सकाळी ११.३० वाजता आल्या होत्या. पती आशिषकुमार यांनी मोटारसायकल सीपीआर रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावरील पार्किंगमध्ये उभी केली. यावेळी त्यांच्यासोबत सोनेरी रंगाची सुटकेस होती. ती रुग्णालयात न नेता त्यांनी मोटारसायकलला अडकविली होती. उपचारांनतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिघे जण पुन्हा मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना सुटकेस तेथे आढळली नाही. सुटकेसमध्ये असलेले सोन्याचे दागिनेही चोरट्याने लंपास केले. यात चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये प्रत्येकी दहा ग्रॅम सोन्याचे गंठण, सोन्याचे मंगळसूत्र व त्याच्या वाट्या, तीन ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानवेल जूड, सोन्याच्या पाच बाळ अंगठ्या व सुटकेस, असा एकूण १ लाख ५८ हजार १०० रुपयांचा माल चोरट्याने लंपास केला. या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मुन्ना कुडची हे करीत आहेत.