महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिणे हिसडा मारून लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:49+5:302021-06-23T04:16:49+5:30
कोल्हापूर : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचा बहाणा करून दोघा युवकांनी निर्जन रस्त्यावरून जाणा-या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र ...

महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिणे हिसडा मारून लंपास
कोल्हापूर : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचा बहाणा करून दोघा युवकांनी निर्जन रस्त्यावरून जाणा-या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र व लक्ष्मीहार असा सुमारे ६० हजारांचा ऐवज हिसडा मारून चोरून नेल्याची घटना घडली. येथील कृषी विद्यापीठातील मुलींचे होस्टेल ते सरनोबतवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी सुनीता जनार्दन कांबळे (वय ५०, रा. नवीन होस्टेलनजीक, कृषी विद्यापीठ, सरनोबतवाडी) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनीता कांबळे या कृषी विद्यापीठातील मुलींच्या होस्टेलवर सफाई कामगार म्हणून काम करतात. सोमवारी सायंकाळी त्या होस्टेलमधील काम उरकून मधल्या रस्त्यावरून सरनोबतवाडीकडे पायी घरी जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून दोघे युवक लाल रंगाची दुचाकी पेट्रोल संपल्याचा बहाणा करून ढकलत पुढे येत होते. त्या कच्च्या मार्गावर खानीजवळ आल्यानंतर त्या दोघा युवकांनी कांबळे यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र व सोन्याचा लक्ष्मीहार हिसडा मारून तोडून घेतले. कांबळे यांनी त्वरित गळ्यावर हात ठेवल्याने अर्धा लक्ष्मीहार त्यांच्या हातात राहिला. चोरट्यांनी हाती लागलेला अर्धा सोन्याचा लक्ष्मीहार व मणी मंगळसूत्र घेऊन पलायन केले. घटनेनंतर कांबळे यांनी आरडाओरडा केला, पण तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकी सुरू करून धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक साहील झिरकार, पो. नि. सीताराम डुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, सुनीता कांबळे यांनी सोमवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्यामध्ये सुमारे २० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र व ४० हजार रुपये किमतीचे एक तोळे सोन्याच्या लक्ष्मीहारचा अर्धा भाग अज्ञातानेेेेेेेेेेेे चोरल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
चेन स्नॅचर पुन्हा सक्रिय
गेले दोन महिने कोरोना परिस्थितीमुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर नसल्याने तसेच पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर असल्याने चेन स्नॅचर गायब झाले होते. अनलॉक होताच हे चेन स्नॅचर पुन्हा सक्रिय झाले आहेत.