मराठा बटालियनच्या दीपक कुंभारची बाजी
By Admin | Updated: November 10, 2014 00:10 IST2014-11-10T00:10:43+5:302014-11-10T00:10:43+5:30
आंतर बटालियन क्रॉसकंट्री स्पर्धा : ११८ इन्फंट्री बटालियन प्रथम; बारा बटालियनचा सहभाग

मराठा बटालियनच्या दीपक कुंभारची बाजी
कोल्हापूर : टेंबलाई हिल कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए) मराठा लाइट इन्फंट्री येथे झालेल्या आंतर बटालियन क्रॉसकंट्री स्पर्धेत ११८ इन्फंट्री बटालियन (ग्रीनेडिअर्स) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर वैयक्तिक बारा किलोमीटर स्पर्धेत मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचा लान्स नायक दीपक कुंभार याने प्रथम क्रमांक मिळविला.
टी.ए. गु्रप हेडक्वार्टर दक्षिण कमान यांच्या मार्गदर्शनाखाली आज, रविवारी झालेल्या या स्पर्धेत प्रबळ शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या स्पर्धेत बारा बटालियननी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ११८ इन्फंट्री बटालियन(टी.ए) ग्रीनेडिअर्स (प्रथम), १०८ इन्फंट्री बटालियन(टी.ए) महार (द्वितीय), १०९ इन्फंट्री बटालियन (टी.ए) मराठा लाइट इन्फंट्री (तृतीय) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
वैयक्तिक गटात १०९ इन्फंट्री बटालियन(टी.ए)मराठा इन्फंट्रीचे लान्सनायक दीपक कुंभार यांनी १२ किलोमीटरचे अंतर ३६.४६ मिनिटांत पूर्ण करीत प्रथम स्थान मिळविले.
यावेळी विजयी खेळाडू व संघाच्यावतीने जल्लोष करण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कर्नल रामेश्वर शर्मा, लेफ्टनंट कर्नल तुकाराम गवारे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजक मेजर करण कदम यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते.