‘त्र्यंबोली’ची ललिता पंचमी जोरात

By Admin | Updated: October 19, 2015 00:14 IST2015-10-19T00:09:18+5:302015-10-19T00:14:21+5:30

भाविकांना सौम्य ‘प्रसाद’

Lalitha Panchami loudspeaker of 'Tryamboli' | ‘त्र्यंबोली’ची ललिता पंचमी जोरात

‘त्र्यंबोली’ची ललिता पंचमी जोरात

कोल्हापूर : सनई-चौघड्यांचा स्वर आणि पारंपरिक वाद्यांचा गजर, मखमली फुलांच्या पायघड्या आणि आकर्षक रांगोळीचा सडा... फुलांनी सजविलेल्या पालख्या... करवीरवासीयांकडून होणारी आरती, शाही लवाजमा आणि तोफांची सलामी... देवी त्र्यंबोली आणि अंबाबाईची अनोखी भेट... अकरा वर्षांच्या कुमारिकेच्या हस्ते कोहळा पूजनाचा विधी... अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी त्र्यंबोलीदेवीची यात्रा रविवारी अभूतपूर्व झाली.शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला त्र्यंबोलीदेवीची यात्रा भरते. यादिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई खास भेटीसाठी त्र्यंबोली देवीकडे जाते. यानिमित्त सकाळी दहा वाजता तोफेच्या व बंदुकीच्या सलामीनंतर अंबाबाई मंदिरातून उत्सवमूर्ती असलेल्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर भवानी मंडपातील तुळजाभवानी देवी व गुरू महाराजांची पालखीही लवाजम्यानिशी निघाली. भाविकांचे स्वागत व पूजन स्वीकारत, सबजेल रोड, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, पार्वती मल्टीप्लेक्समार्गे पालख्या शाहू मिल परिसरात आल्या. येथे संस्थानकालीन परंपरेनुसार पालख्यांचे पूजन, आरती झाली. टाकाळा येथील मातंग वसाहतीमध्ये काही काळ विसावल्यानंतर दुपारी १२.४५ वाजता तिन्ही पालख्या त्र्यंबोली येथे पोहोचल्या. त्यानंतर श्री अंबाबाई आणि त्र्यंबोली या दोन्ही देवींची भेट झाली. गुरव घराण्यातील मृदुला संतोष गुरव या अकरा वर्षीय कुमारिकेकडून कोहळा पूजन झाले. देवीची आरती झाल्यानंतर युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते मृदुला गुरव हिचे कुमारीपूजन झाले. यावेळी ठीक दुपारी १.१५ वाजता करवीरचे तलाठी अनिल काटकर व छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा फोडण्याचा (कृष्मांड बळी) विधी झाला. यावेळी त्र्यंबोलीदेवीची पूजा सिंहासनारूढ पद्धतीने बांधण्यात आली होती. ही पूजा शिवदीप गुरव, संतोष गुरव, टेंबलू गुरव, सुरेश गुरव, दीपक गुरव, प्रदीप गुरव, विक्रम गुरव, विजय गुरव यांनी बांधली होती. यावेळी यौवराज यशराजराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, नंदकुमार मराठे, आदी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता बिंदू चौक कमानीतून प्रवेश करीत अंबाबाईची पालखी संत गाडगे महाराज चौकातून घाटी दरवाजामार्गे पुन्हा मंदिरात आली.
भाविकांना सौम्य ‘प्रसाद’
दरवर्षी कोहळा फोडल्यानंतर त्याचा तुकडा मिळविण्यासाठी नागरिक जिवाचा आटापिटा करतात. यामध्ये अनेकजण जखमीही होतात. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासनाने त्र्यंबोली मंदिराच्या सभोवती लोखंडी अडथळे बांधले होते. तरीही उत्साही भाविकांनी कोहळ्याचा तुकडा मिळविण्यासाठी हमरीतुमरी केली. यावेळी पोलिसांनी या भाविकांना सौम्य लाठीमाराचा थोडा प्रसाद दिला.


पाणी, प्रसादाचे वाटप
संपूर्ण पालखी मार्गावर टाकाळा नवचैतन्य मंडळ, टाकाळा मित्रमंडळ, समाजसेवा मित्रमंडळ, राजारामपुरी येथील राजाराम गार्डन केबिनधारक मंडळ, राजारामपुरी व्यापारी व फेरीवाले संघटना व नागरिकांनी भक्तांसाठी पाणी, प्रसाद आणि अंबाबाई देवी, तुळजाभवानी देवी, गुरुमहाराज यांच्या पालख्यांसाठी फुलांच्या पायघड्या आणि आकर्षक रांगोळी काढली होती.


बससेवा मोफत
ललिता पंचमीनिमित्त ‘केएमटी’च्या चार बसेस बिंदू चौक ते त्र्यंबोली देवी मंदिर मार्गावरून पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत धावत होत्या. शहराच्या इतर मार्गांवरूनही जाणाऱ्या बसेस टाकाळा सिग्नल, टेंबलाई फाटक, शिवाजी विद्यापीठ मार्गावरून ये-जा करीत होत्या. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे यंदा पहाटे पाचपासून बिंदू चौक ते त्र्यंबोली देवी मार्गावर मोफत बससेवा ठेवण्यात आली होती.

Web Title: Lalitha Panchami loudspeaker of 'Tryamboli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.