भरदिवसा दहा लाखांचे दागिने लंपास
By Admin | Updated: April 12, 2015 01:00 IST2015-04-12T01:00:49+5:302015-04-12T01:00:49+5:30
कागल येथील घटना : ५० तोळे दागिने; दरवाजा उचकटून चोरट्यांचा बंगल्यात प्रवेश

भरदिवसा दहा लाखांचे दागिने लंपास
कागल : येथील जयसिंगराव पार्कमध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवारी भरदिवसा बंगला फोडून तब्बल १० लाख किंमतीचे
५० तोळे दागिने लंपास केले. बंगल्याच्या पाठीमागील कंपौंडवरून आत येऊन पाठीमागील दरवाजा उचकटून ही घरफोडी झाली. सकाळी साडेअकरा ते दुपारी एकच्या दरम्यान ही चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चोरीची घटना लक्षात आल्यानंतर कागल पोलिसांनी कोल्हापूरहून तत्काळ श्वानपथक मागविले. सुझी या श्वानाने मधाळे यांचे घर ते महामार्गापर्यंतचा माग काढला. घरातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर अवघ्या दीड तासात अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली आहे. ही चोरी पाळत ठेवून केल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एल.आय.सी.चे विमा प्रतिनिधी असणाऱ्या मिलिंद मधाळे यांचा जयसिंगराव पार्कमध्ये कृषी कार्यालयासमोर ‘सोनम’ नावाचा बंगला आहे. घरी पती-पत्नी, दोन मुले असे राहतात. शनिवारी कामानिमित्त हे सर्वजण बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले.
अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून कटावणी आणि लोखंडी पाईपच्या साहाय्याने कपाटाचे दरवाजे उघडून आतील ५० तोळे दागिने चोरले. पोलिसांनी घटना लक्षात आल्यानंतर तातडीने श्वान पथकास पाचारण केले. चोरट्याने तेथेच टाकून दिलेली लहान लोखंडी पाईप, कपाटांच्या किल्ल्यांचा जुडगा यांचा वास ‘सुझी’ला दिला. हे श्वान मधाळे घर ते कृषी कार्यालय, विजयादेवी घाटगे गार्डन येथून ममता प्रिटिंग प्रेस तेथून टेलिफोन भवनच्या मागून जुन्या पोलीस चाळीजवळून फौजदार बंगल्यासमोरून महामार्गापर्यंत जाऊन घुटमळले.
यावरून एकापेक्षा अधिक चोरटे असावेत असा अंदाज असून, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. तसेच कोठे सीसीटीव्ही कॅमेरा या परिसरात आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, वाकचौरे करीत आहेत. (प्रतिनिधी)