‘जलयुक्त’मधून चार तलावांचा बदलला ‘लूक’
By Admin | Updated: August 18, 2015 00:45 IST2015-08-18T00:45:46+5:302015-08-18T00:45:46+5:30
जिल्ह्यातील १६ कामे : टंचाईग्रस्त गावांचा सहभाग नसल्याच्या तक्रारी

‘जलयुक्त’मधून चार तलावांचा बदलला ‘लूक’
भीमगोंडा देसाई / कोल्हापूर
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून जिल्ह्यातील चार गावतलावांचा लुक बदलला आहे. गाळ आणि जलपर्णीने भरलेल्या तलावांनी मोकळा श्वास घेतला आहे. आठ विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे. अभियानातून आतापर्यंत ४० लाखांची कामे झाली आहेत. झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे ४३ लाख १३ हजार रुपयांचा निधी वर्ग केला आहे.
जलसंधारणावर कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला असला तरी अपेक्षित क्षेत्र पाण्याखाली आलेले नाही. सर्व गावे टंचाईमुक्त झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कृषिक्षेत्राला बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे चित्र बदलण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे, अडविण्याची कामे यातून प्राधान्याने हाती घेतली जात आहेत. जिल्ह्यात कृषी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेकडून कामे सुरू आहेत. बारा गावांतील २१ कामांची निवड करण्यात आली.
दरम्यान, निवडलेल्या बहुतांश गावांत मुबलक पाणी आहे. भीषण पाणीटंचाईच्या गावांची निवड झालेली नाही. गावांची निवड करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही, अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच गावांची निवड केली आहे, अशा तक्रारी आहेत. तरीही यंत्रणा निवडलेल्या गावांत काम करीतच राहिली. मे महिन्यात कामाला सुरुवात केली. या अभियानातून गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावतलावात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढला आहे. तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. नूल गावतलाव गाळाने भरला होता. जलपर्णीमुळे दुर्गंधी सुटत होती. या तलावातील गाळ काढून तो स्वच्छ करण्यात आला आहे. लिंगनूर, नेसरी, हेब्बाळ, कसबा नूल येथील गावतलावांतील गाळही काढण्यात आला आहे.
राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी, बेरकळवाडी, तळगाव या गावांत विहीर पुनर्भरणाची कामे झाली आहेत. कोळगाव, टेकोली येथे पिण्याच्या पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत नदीचे पाणी पोहोचविण्यासाठी (ट्रेंच गॅलरी) चरखुदाईचे काम घेण्यात आले आहे. मोरेवाडी (ता. भुदरगड), बावेली (ता. गगनबावड) येथे विंधन विहीर पुनर्भरणाचे काम करण्यात येणार आहे.
कामांना ब्रेक
पूर्वीच्या झालेल्या कामांना निधी न मिळणे, पावसाळा यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना ब्रेक लागला आहे. आतापर्यंत पावसाची वक्रदृष्टी राहिल्याने जलयुक्त शिवारची उर्वरित कामे कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.