धोकादायक वळणावर सेवा रस्त्यांची कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:37+5:302020-12-14T04:35:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर ते लक्ष्मी टेकडीपर्यंतच्या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा भाग ...

Lack of service roads on dangerous turns | धोकादायक वळणावर सेवा रस्त्यांची कमी

धोकादायक वळणावर सेवा रस्त्यांची कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर ते लक्ष्मी टेकडीपर्यंतच्या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा भाग ब्लॅक स्पॉट बनला आहे. या पट्ट्यातील सेवा रस्त्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. सुविधांअभावी येथे वारंवार अपघात होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना हा रस्ता धोकादायक ठरत आहे.

उजळाईवाडीतील समर्थ मंगल कार्यालय ते विश्व कर्मा हौसिंग सोसायटीसमोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता नाही, तर उजळाईवाडी विमानतळ रोडवरील विवेकानंद हायस्कूल ते महालक्ष्मीनगर, मयूर पेट्रोल पंप ब्रिजपर्यंत सेवा रस्ता नाही. तसेच गोकुळ शिरगाव स्मशानभूमीपासून उजळाईवाडी उड्डाणपूलपर्यंत सेवा रस्ता नाही. त्यामुळे या भागात जीव मुठीत घेऊन महामार्गावर दररोज अनेकजण उलट्या दिशेने प्रवास करत असतात. त्यात महामार्गाच्या साईडपट्ट्यांचा भराव खचल्याने दगडगोटे तयार होऊन खळगेच निर्माण झाले आहेत. अशा रीतीने धोकादायक स्थितीत वाहनधारकांना प्रवास करावा लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्यावेळी तर असा हा उलटा प्रवास जीवघेणा ठरतो. महालक्ष्मी नगर येथील सेवा रस्ता करण्यासाठी प्रयत्न अर्धवट केले. येथील लोकही उलट्या दिशेने उजळाईवाडीत ये-जा करतात. देसाई गल्ली - फॅब्रिकेशन गोडाऊनपर्यंत रस्ता पूर्ण करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

चौकट:-

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

या परिसरातील सेवा रस्त्यांची कमतरता पाहता महामार्गावरून उलट दिशेने गैरमार्गाने अनेकजण प्रवास करत असतात. या परिसरात महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व दिवाबत्तीची सोय करण्याची गरज आहे. सेवा रस्ता नसल्याने स्थानिक भागातील नागरिकांना वारंवार उलट्या दिशेने यावे-जावे लागते. अशा परिस्थितीत अनेकवेळा अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहनचालकांना प्राण गमवावा लागतो किंवा जायबंदी होतात. अशावेळी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास धडक देणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्यात मदत होईल.

फोटो ओळ :

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते

वाढत्या वाहनांमुळे धोकादायक वळणावर वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते.

छाया : मोहन सातपुते

Web Title: Lack of service roads on dangerous turns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.