रुग्णकल्याण निधीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:29+5:302021-01-08T05:17:29+5:30
सरूड : चालूवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णकल्याण निधी न मिळाल्याने प्राथमिक आरोग्य ...

रुग्णकल्याण निधीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कामे रखडली
सरूड : चालूवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णकल्याण निधी न मिळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांतील देखभाल, दुरुस्तीसह या निधीतून मार्गी लागणारी अनेक कामे व साहित्य खरेदी रखडली असून या निधीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे व्यवस्थापन करताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील देखभाल, दुरुस्ती व इतर व्यवस्थापन खर्चासाठी शासनाच्यावतीने प्रत्येक आरोग्य केंद्रास सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचा रुग्णकल्याण निधी दरवर्षी दिला जातो. या निधीतून आरोग्य केंद्राच्या इमारतींची तसेच साहित्यांची देखभाल, दुरुस्ती करणे, स्वच्छता तसेच आरोग्य साहित्य खरेदी करणे, संगणकविषयी खर्च आदी खर्चाबरोबरच रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधांची खरेदी केली जाते. दरवर्षी दोन टप्प्यात हा रुग्णकल्याण निधी प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाचा बहुतांश निधी हा कोरोनावरील उपाययोजनांवर खर्च झाला आहे.
दरम्यान, रुग्णकल्याण निधी उपलब्ध न झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामांसाठी तसेच साहित्य खरेदी करण्यासाठी खर्चाची तरतूद कोठून व कशी करायची? हा प्रश्न आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे . चालू आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने उरले असतानाही यावर्षीचा रुग्णकल्याण निधी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाला नसल्याने आरोग्य केंद्रांतील व्यवस्थापनाच्यादृष्टीने असणारी अनेक कामे रखडली आहेत.
यावर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे आरोग्य विभागाचा बहुतांश निधी हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर खर्च झाला आहे. त्यामुळे यावर्षी प्राथमिक आरोग्य केद्रांना रुग्णकल्याण निधी वेळेत मिळू शकला नाही. परंतु येत्या काही दिवसातच सर्व आरोग्य केंद्रांना हा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
- हंबीरराव पाटील, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जि. प. कोल्हापूर