आजऱ्यात ऑक्सिजन बेडअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:16+5:302021-05-19T04:24:16+5:30
सदाशिव मोरे आजरा : तालुक्यात १ एप्रिलपासून १,२३३ पॉझिटिव्ह, तर २,३६० निगेटिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण ४६२ असून, ...

आजऱ्यात ऑक्सिजन बेडअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले
सदाशिव मोरे
आजरा : तालुक्यात १ एप्रिलपासून १,२३३ पॉझिटिव्ह, तर २,३६० निगेटिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण ४६२ असून, गेल्या ४७ दिवसांत २५ गावांतील ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दक्षता न घेणे व अतित्रास सुरू झाल्यानंतर दवाखान्यात दाखल होणे, यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सध्या तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड वाढवण्याची गरज आहे.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचे वाढलेले प्रमाण पाहता सर्वत्र भितीयुक्त वातावरण आहे.
तालुक्यातील ९४ गावे-वाड्यावस्त्यांपैकी २५ गावांतील ४३ जणांचा झालेला मृत्यू व रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी फिरावे लागत असल्याने बहुतांशी नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे.
तालुक्यात उत्तूर ४, कानोली, महागोंड, चव्हाणवाडी प्रत्येकी ३, लाटगाव, भादवण, मडिलगे, वडकशिवाले, बेलेवाडी, सरंबळवाडी, करपेवाडी, आजरा प्रत्येकी २, तर खेडे, पोश्रातवाडी, मेंढोली, पेरणोली, होन्याळी, मासेवाडी, कोवाडे, सुळे, किणे, सरोळी, निंगुडगे, आर्दाळ, उचंगी याठिकाणी प्रत्येकी १, असा ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात ३ कोविड सेंटर आहेत. त्यापैकी ५३ बेड ऑक्सिजनचे आहेत, तर १९२ बेड ऑक्सिजन नसलेले आहेत. साळगाव रोडवरील शासकीय कोविड सेंटरमध्ये २० ऑक्सिजन, तर १४० नियमित बेड, मुमेवाडी येथील मुकुंददादा आपटे फाउंडेशन कोविड केअरमध्ये ऑक्सिजन ८, तर २७ नियमित बेड, रोझरी कोविड सेंटरमध्ये २५ ऑक्सिजन, तर २५ नियमित बेड आहेत. तीनही ठिकाणचे ऑक्सिजन बेड फुल आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत फिरावे लागत आहे. रोझरी सेंटरवर ऑक्सिजन बेडसाठी प्रतिदिन ३,७५० रुपये, तर नियमित बेडसाठी २,५०० रुपये द्यावे लागतात. साळगाव रोडवरील कोविड सेंटरमध्ये सध्या औषधे नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत आहेत.
मुमेवाडी येथील मुकुंददादा आपटे फाउंडेशनने सर्व रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी जि.प.चे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य उमेश आपटे यांनी सेंटर नागरिकांच्या देणगीतून सुरू केले आहे. याठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.
ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन व
व्हेंटिलेटर बेडची गरज
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आजरा ग्रामीण रुग्णालयात ५० बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोय करावी, अशी मागणी होत आहे.