उपमुख्यमंत्री अजित पवार चार दिवसांपूर्वी पूर पाहणी दौऱ्यासाठी येऊन गेले. पहिल्यांदा ते हातकणंगले तालुक्यातील एका गावात गेले. या महापुरात हे गाव शंभर टक्के बुडाले होते म्हणून ग्रामस्थांनी शासनाकडे पर्यायी जागा देण्याची मागणी केली. पवार यांनी जागा लगेच देतो परंतु गावातील हे जे कोटी-कोटीचे बंगले दिसतात ना ते सरकारजमा करावे लागतील, असे सुचविल्यावर जागा मागणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.
-------------
असाही फायदा...
गोष्ट दोन दिवसांपूर्वीची. करवीर तालुक्यातील एका गावाच्या कट्ट्यावर चर्चा रंगली होती. साहेबांचा मुलगा झेडपीचा अध्यक्ष झाल्याबद्दल काँग्रेसवाले खुशीत होते. त्यातून विषय सुरू झाल्यावर गावातला एका खडूस कार्यकर्त्याने नेमकं दुखऱ्या नसीवर बोट ठेवलं. म्हणतोय कसा... ‘राहुल अध्यक्ष झाल्याने काँग्रेसचा काय फायदा होणार याचा हिशोब नंतर मांडू; परंतु किमान काँग्रेसमधील दोन्ही प्रमुख साहेबांचे फोटो एका डिजिटलवर झळकले हे काय कमी झाले व्हय? नाहीतर आम्हाला कुणाचा फोटो लावायचा यापेक्षा कुणाचा लावायचा नाही, यावरूनच जास्त तरास व्हायचा हो... त्यातून आता सुटका झाली बघा...’
गुणवत्तेला टोंगा...
‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा... काय भुललासी वरलिया रंगा’ असा संत चोखोबांचा एक अभंग आहे. परंतु, सध्याचे दिवस वरलिया रंगाला भुलण्याचेच आहेत. हे आठवण्याचे कारण म्हणजे कोल्हापुरात गेल्या आठवड्यात चौकाचौकांत भले मोठे (राजकीय पुढाऱ्यांनाही मागे टाकणारे) डिजिटल झळकले. कारण काय तर या साहेबांना म्हणे कुण्या टोंगा विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली. या विद्यापीठाची आणि त्यांनी दिलेल्या विकतच्या पदव्या घेणाऱ्यांची गुणवत्ता काय, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेनेही एखादी समिती नेमायला हरकत नसावी, अशी चर्चा हायस्कूलच्या गुरुजींमध्ये सध्या सुरू आहे.