कुरुंदवाडची पाणी योजना मार्गी लागणार
By Admin | Updated: November 20, 2015 00:17 IST2015-11-19T20:58:01+5:302015-11-20T00:17:53+5:30
मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील : चौदा कोटी ९२ लाखांच्या योजनेला तत्त्वत: मंजुरी

कुरुंदवाडची पाणी योजना मार्गी लागणार
कुरुंदवाड : शहराच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेला अखेर तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. सुमारे चौदा कोटी ९२ लाख ६८ हजार रुपये खर्चाच्या या योजनेमुळे शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.शहराला सध्या संस्थानकालीन नळपाणी पुरवठा योजना आहे. मात्र, गेल्या ५० वर्षांत शहराची लोकसंख्या वाढल्याने व योजनाही कालबाह्य झाल्याने अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या व अनियमित पाण्यामुळे नळ कनेक्शन संख्याही घटल्याने पालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट आली आहे. शिवाय योजना संस्थानकालीन असल्याने वारंवार लागणाऱ्या गळतीतून पालिका प्रशासनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चौदा कोटी ९२ लाख ६८ हजार रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव करण्यात आला होता.या योजनेला तत्त्वत: मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. नगराध्यक्षा मनीषा डांगे, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे यांच्यासह मुख्याधिकारी अतुल पाटील या योजनेचा पाठपुरावा
करीत आहेत. योजनेच्या मंजुरीसाठी आमदार उल्हास पाटील यांनी शहरवासीयांना शब्द दिल्याने पालिकेचे शिष्टमंडळ घेऊन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळवली. त्यामुळे योजना मार्गी लागण्यातील अडसर दूर झाला आहे. (वार्ताहर)
औरवाड पुलाजवळ इंटक
सध्या शहराला कृष्णा घाट येथील संगमाजवळून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाण्याचा प्रवाहही या पात्रात मिसळत असल्याने शहरालाही दूषित पाणीच मिळत आहे. नव्या योजनेमुळे पालिकेने याची दखल घेऊन, नृसिंहवाडी-औरवाड पुलापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर पाणी उपसा टाकी उभारण्यात येणार असल्याने भविष्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा काहीही परिणाम होणार नाही.
मुख्यमंत्र्यांची मान्यता : उल्हास पाटील
कुरुंदवाडला शुद्ध आणि मुबलक पाणी कायमस्वरूपी मिळावे, यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. योजनेचा सत्वर अहवाल सादर करावा, असा आदेश देऊन या योजनेस तत्त्वत: मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे कुरुंदवाडकरांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळणार आहे, अशी माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.