कुरुंदवाड शाहू संस्था आदर्श पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:32+5:302021-09-08T04:31:32+5:30
कुरुंदवाड : सहकारी पतसंस्थेत आदर्शवत कामकाजातून सहकाराचा आदर्श घालून देणारे येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेला कोल्हापूरच्या ए. एस. ...

कुरुंदवाड शाहू संस्था आदर्श पुरस्काराने सन्मानित
कुरुंदवाड : सहकारी पतसंस्थेत आदर्शवत कामकाजातून सहकाराचा आदर्श घालून देणारे येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेला कोल्हापूरच्या ए. एस. प्रतिष्ठानचा यंदाचा आदर्श सहकारी संस्था, आदर्श अध्यक्ष, आणि आदर्श सचिव असा एकाच वेळी तीनही पुरस्कार प्राप्त करून सहकारातील आदर्शवत कारभार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. त्यामुळे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांच्याहस्ते व विधितज्ज्ञ ॲड. रणजित घाटगे यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण आलासे व माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी पत्रकारांना दिली.
सहकारातून शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नड काढून स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. सहकाराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत संस्था आणि सभासदांचे हित जोपासण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पारदर्शी कारभार केल्याने संस्थने सभासद, कर्जदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.
संस्थेच्या पाच शाखा असून संस्थेचे संचालक मंडळ केवळ विश्वस्तांची भूमिका बजावत असून पारदर्शक कारभारामुळे सहकारातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सहकारीत मानाचा समजला जाणारा ‘बँको’ पुरस्कार संस्थेला चार वेळा व आदर्श पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे. या पुरस्काराने गौरवापेक्षा जबाबदारी वाढली असून, सहकार अधिक सक्षम करण्याबरोबरच सभासदांचे आर्थिक उन्नती करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक जिनगोंडा पाटील, उपाध्यक्षा सुषमा उपाध्ये, संस्थेचे व्यवस्थापक संजय गजण्णावर उपस्थित होते.