व्हॉलिबॉलसाठी कुरुंदवाड सज्ज
By Admin | Updated: December 9, 2014 00:54 IST2014-12-09T00:51:18+5:302014-12-09T00:54:41+5:30
उद्यापासून प्रारंभ : राज्यातून ७६ संघ दाखल; तयारी अंतिम टप्प्यात

व्हॉलिबॉलसाठी कुरुंदवाड सज्ज
कुरुंदवाड : येथे होणाऱ्या ४६व्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा व्हॉलिबॉल अजिंक्य स्पर्धेसाठी कुरुंवाडनगरी सज्ज झाली आहे. या स्पर्धा बुधवार
(दि. १०) पासून सुरू होत असून, सोमवार (दि. १५) पर्यंत रंगणार आहेत. स्पर्धेकरिता तबक उद्यानातील क्रीडांगण विविध सोयी-सुविधांनी तयार करण्यात आल्याची माहिती श्री स्पोर्टस्चे अध्यक्ष जयराम पाटील, नगराध्यक्ष संजय खोत, प्राचार्य सुनील चव्हाण, प्राचार्य बी. डी. सावगावे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
श्री स्पोर्टस् क्लब यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेकरिता राज्यातून पुरुष व महिला गटातील ७६ संघ सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने एक हजार खेळाडू व २०० पंच, प्रशिक्षक, निवड पदाधिकारी अशा दररोज १२०० जणांच्या जेवणाची सोय जैन सांस्कृतिक भवनमध्ये केली आहे, तर खेळाडूंच्या निवासाची सोय नृसिंहवाडी व कुरुंदवाड शहरातील ११८ खोल्यांमध्ये केली आहे. निवासस्थानापासून मैदानापर्यंत खेळाडूंना आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था असून, आपत्कालीन व्यवस्थेसाठी लायन्स क्लब व मिरज येथील गुलाबराव पाटील ट्रस्टच्या रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. स्पर्धेकरिता कुरुंदवाड नगरपालिकेच्या तबक उद्यानमध्ये चार सुसज्ज मैदाने तयार केली आहेत. सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तीन सत्रांत या स्पर्धा होणार आहेत. यासाठी २८ फूट उंचीची विद्युतझोत व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना स्पर्धा व्यवस्थित पाहता यावी याकरिता तयार असलेल्या गॅलऱ्यांची रंगरंगोटी करून बसण्याची व्यवस्था केली आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रयोजक बॅँक आॅफ महाराष्ट्र आहे.
स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सहा वाजता श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या हस्ते व जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. (वार्ताहर)