कुरुंदवाडला सोमवारपासून राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा
By Admin | Updated: January 9, 2016 01:26 IST2016-01-09T01:08:27+5:302016-01-09T01:26:07+5:30
अठरा राज्यांतील संघ : शहरात पहिल्यांदाच आयोजन

कुरुंदवाडला सोमवारपासून राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा
कुरुंदवाड : येथील साने गुरुजी विद्यालयात ११ ते १३ जानेवारी या कालावधीत १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या ६१ व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील अठरा राज्यांतील संघ सहभागी होणार असून, खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व विकास माने यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डिसेंबर २०१५ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील विजेतेपदाच्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून वेटलिफ्टिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा कुरुंदवाड शहरात प्रथमच होत आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश अशा देशभरातील अठरा राज्यांतील संघ सहभागी होणार आहेत.
भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग, कुरुंदवाड दत्त कनिष्ठ महाविद्यालय, साने गुरुजी विद्यालय व हर्क्युलस जिम्नॅशिअम यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात येत असून या स्पर्धेचे बॅँक आॅफ महाराष्ट्र प्रायोजक आहेत. खेळाडूसह प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक पंच, तांत्रिक अधिकारी असे एकूण ३५० खेळाडू व पदाधिकारी सहभागी होत असून आयोजन समितीच्यावतीने सर्वांची मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवारी होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य क्रीडा व युवक सहसंचालक नरेंद्र सोपल, विभागीय उपसंचालक उदय जोशी, माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गौतम पाटील, गणपतराव पाटील, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार बैठकीला अजित पाटील, प्राचार्य अण्णासाहेब माने-गावडे, वेटलिफ्टर पंच विजय माळी उपस्थित होते.