कुरुंदवाड होणार सीसीटीव्हीत कैद
By Admin | Updated: January 19, 2017 00:29 IST2017-01-19T00:29:56+5:302017-01-19T00:29:56+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीला बसणार आळा : नगराध्यक्ष जयराम पाटील यांचा निर्णय

कुरुंदवाड होणार सीसीटीव्हीत कैद
गणपती कोळी --कुरुंदवाड ---येथील नगरपालिका व लोकसहभागातून शहरात ६३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार असून गुन्हेगारांना आळा बसणार आहे.
कुरुंदवाड हे निमशहर असले तरी परिसरातील सत्तावीस गावांची बाजारपेठ आहे. त्यामुळे या शहरात शेतकरी, व्यापारी यांची नेहमी वर्दळ असते. या गर्दीचा गैरफायदा घेत अनेकवेळा महिलांची छेडछाड, चोरी, चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत असताना पोलिसांना चोर पकडण्याचे आव्हान पेलावे लागत आहे.
त्यामुळे अशा गुन्हेगारांना पकडणे व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शहरात मुख्य चौक, रस्ते, महाविद्यालय, एस.टी.स्टँड अशा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी नगरपालिकेला कळविले होते.
पोलिसांच्या या सूचनेची दखल घेत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा आर्थिक खर्च असल्याने पोलिस अधिकारी कदम यांनी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था यांना सीसीटीव्हीसाठी सहभागी होण्याचे आवाहन केल्याने शहरवासीयांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे स्वप्न पुरे होणार आहे. ठेकेदाराकडून पाहणी करण्याचे काम चालू
झाले असून, शहर
लवकरच सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षेत येणार आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षितता, वाहन पार्किंग शिस्तबद्धता बरोबरच गुन्हेगारांना आळा बसणार आहे.
६३ कॅमेरे बसविणार
शिवतीर्थ, जुने एस.टी. स्टँड, सन्मित्र चौक, माळभाग, बौध्द समाज मंदिर, थिएटर चौक, नगरपालिका चौक, शेळके मशीद, शिरढोण फाटा, दत्त कॉलेज अशा एकूण २२ ठिकाणी ६३ कॅमेरे
बसविण्यात येणार आहेत.