कुरुंदवाडमध्ये अतिक्रमणधारकांच्या अर्जांचा फार्सच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:09+5:302021-08-21T04:27:09+5:30

गणपती कोळी लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमणांच्या नियमितीकरण प्रश्नाचे घोंगडे नगराध्यक्षांनी भिजत ठेवल्याने पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील ...

In Kurundwad, the applications of encroachers are farcical | कुरुंदवाडमध्ये अतिक्रमणधारकांच्या अर्जांचा फार्सच

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमणधारकांच्या अर्जांचा फार्सच

गणपती कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमणांच्या नियमितीकरण प्रश्नाचे घोंगडे नगराध्यक्षांनी भिजत ठेवल्याने पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आघाडी अडचणीत सापडली आहे. अतिक्रमण नियमित करण्याचा कालावधी वर्ष अखेरीस संपणार असल्याने व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी अतिक्रमणधारकांचे अर्ज स्वीकारण्याचा केवळ फार्स केल्याने अतिक्रमणधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, सत्ताधारी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे.

वर्षअखेरीस पालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय गट सत्ता मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. शहरातील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण कायम करण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यातच शासनाने दीड वर्षांपूर्वी शासन आदेश काढून अतिक्रमण नियमित करण्याबाबत निर्णय घेतला असल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष पाटील यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमित करून देण्यासाठी अर्ज स्वीकारले.

अतिक्रमण नियमितीकरण करुन घेण्याची मुदत वर्षअखेरीस संपणार आहे. फाऊंडेशनने अतिक्रमणधारकांचे अर्ज केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून पाठपुरावा न केल्याने प्रस्ताव धूळखात पडले आहेत. सहा महिने उलटले तरी प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने व सहा महिन्यांत प्रस्तावाची मुदत संपणार असल्याने शहर बचाव कृती समितीने याविषयी चौकशी केली असता, फाऊंडेशनचा राजकीय फार्स उघडकीस आला.

अतिक्रमित जागेच्या मोजणीसाठी मिळकत नंबर, त्यामध्ये येणारी मिळकत याची इत्यंभूत माहिती भूमी अभिलेख विभागाला देऊन त्याची रक्कमही भरावी लागते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. शिवाय ठराविक गट नंबरच्या मोजणीसाठी भूमी अभिलेखकडे अर्ज केल्याने नगराध्यक्षांचा अतिक्रमधारकांबाबतचा पक्षपातीपणा उघडकीस आल्याने अतिक्रमणधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे विरोधकांवर खेळी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसवरच उलटल्याने शहरात याविषयीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

-------------------

कोट -

अतिक्रमण नियमितीकरणासाठीचे प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे सादर करायचे असतात. मात्र, विजय पाटील यांनी फाऊंडेशनच्या नावाखाली प्रस्ताव गोळा करुन व त्यांचा पाठपुरावा न केल्याने अतिक्रमणधारकांची फसवणूक केली आहे. अतिक्रमणधारकांना न्याय मिळेपर्यंत प्रशासनाविरोधात आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे.

- सुनील कुरुंदवाडे, शहर बचाव कृती समिती निमंत्रक

Web Title: In Kurundwad, the applications of encroachers are farcical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.