‘बॉटनी’ने चालविली ४३ झाडांवर कुऱ्हाड
By Admin | Updated: November 27, 2014 00:13 IST2014-11-26T23:50:58+5:302014-11-27T00:13:47+5:30
पर्यावरणप्रेमींची तक्रार : महापालिका बजाविणार विद्यापीठाला नोटीस

‘बॉटनी’ने चालविली ४३ झाडांवर कुऱ्हाड
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र (बॉटनी) विभागाच्या परिसरात ४३ झाडे तोडण्यात आली असल्याचे आज, बुधवारी समोर आले आहे. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर महानगरपलिकेच्या उद्यान निरीक्षकांनी त्यांचा पंचनामा केल्यानंतर हे स्पष्ट झाले. झाडे तोडल्याप्रकरणी महापालिका विद्यापीठाला नोटीस बजाविणार असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
वनस्पतिशास्त्र विभागाच्या परिसरात बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आली आहे. या बागेच्या भागातील मोठ्या आकाराची झाडे तोडण्याचा प्रकार घडला आहे. त्याची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यावर काही पर्यावरणप्रेमींनी महानगरपालिकेकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर आज, बुधवारी सकाळी उद्यान निरीक्षक प्रतिभा राजेघाडगे यांनी या परिसराचा पंचनामा केला. यात एकूण ४३ झाडे तोडली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये सुबाभूळची २७, गिरीपुष्पची सात आणि इतर नऊ झाडे आहेत. झाडे तोडल्याची माहिती व पर्यावरणप्रेमींकडून तक्रार झाल्यानंतर महापालिकेने या परिसराचा पंचनामा केला. त्याचा अहवाल तयार करून तो वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठविणार आहे. विद्यापीठाने संबंधित झाडे तोडण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतलेली नसल्याची माहिती शहर अभियंता सरनोबत यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाने वनस्पतिशास्त्र विभागप्रमुखांकडून या प्रकरणाबाबत खुलासा मागविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने विद्यापीठाला बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी निधी दिला आहे. या गार्डनसाठी प्रवेशद्वार तयार करण्यासाठी झाडे तोडली असल्याचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. आर. यादव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
गांभीर्याने घेणार का ?
विद्यापीठात यापूर्वी देखील भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र विभाग आणि कॅम्पस्मध्ये काही ठिकाणी बेकायदेशीरपणे झाडे तोडण्याचा प्रकार घडला आहे. त्याकडे प्रशासनाने जुजबी कारवाई करीत दुर्लक्ष केले. यावेळी तर चक्क ‘बॉटनी’मध्येच झाडे तोडण्यात आली आहेत. इतरांना वृक्षसंवर्धन, त्यांच्या पुनर्राेपणाबाबत जनजागृती करणाऱ्या विभागाकडून असा गंभीर प्रकार घडला आहे. बेकायदेशीरपणे झाडांची होणारी तोड थांबविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आता तरी जागे होऊन याबाबत गांभीर्याने काही उपाययोजना करणार का ? असा सवाल पर्यावरणप्रेमींतून केला जात आहे.