कुंभी, भोगावती काठावर उसाच्या फडावर मातीचा थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:54+5:302021-09-21T04:26:54+5:30
दुसऱ्या पुराने पुन्हा उरलेलेल्या कांड्याही कुजणार. पाने कुरतडणाऱ्या अळीचा हल्ला प्रकाश पाटील कोपार्डे : चार नद्यांचा सुपीक भागात ...

कुंभी, भोगावती काठावर उसाच्या फडावर मातीचा थर
दुसऱ्या पुराने पुन्हा उरलेलेल्या कांड्याही कुजणार.
पाने कुरतडणाऱ्या अळीचा हल्ला
प्रकाश पाटील
कोपार्डे : चार नद्यांचा सुपीक भागात वसलेल्या करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून महापुराने रडकुंडीस आणले आहे. पुराचे पाणी ऊस शेतीत गेल्यामुळे उसाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करवीर तालुक्यातील कुंभी, भोगावती, पंचगंगा व तुळशी नदी काठावर असलेली ऊसशेती ढगफुटीसदृश पावसाने पाण्याखाली गेली. यावर्षी पाण्याच्या पातळीने आजपर्यंतच्या महापुराची उच्चांकी आकडेवारी गाठली आहे. पण मुसळधार पावसामुळे भूस्खलनसदृश परिणाम झाल्याने प्रवाही पाण्याबरोबर मातीही वाहून आल्याने जुन झालेल्या आडसाली उसाचे शेंडे कुजले. याचा परिणाम उसाच्या कांड्यांवर झाला असून, त्याही कुजल्या आहेत.
चौकट : हारवळ व ओढ्याकाठच्या पिकांचेही नुकसान
महापुराने उच्चांकी पाणी पातळी गाठल्याने नद्यांना मिळणारे मोठ्या हारवळ, ओढे, नाले यांचे पाणी आजूबाजूच्या शेतात स्थिरावले. यामुळे हारवळ ओढ्यांच्या काठावर असलेल्या भात, भुईमूग व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. आडसाली लागवडीच्या हंगामात मुसळधार पाऊस झाल्याने आडसाली उसाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, करवीर तालुक्यात सध्या ४५० च्या वर गुऱ्हाळघरे आहेत. पण, नदीकडेचा ऊस मातीने माखल्याने गुऱ्हाळघरांना ऊस टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
कोट : नदीबूड क्षेत्रातील उसाचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करताना अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. परिस्थितीजन्य नुकसानीचे पंचनामे करून किमान आर्थिक मदत मिळावी.
पंडित केरबा पाटील, शेतकरी, खाटांगळे
नुकसानीचा लेखाजोखा
नुकसानग्रस्त शेतकरी - ३९ हजार २३४
१० हजार २२८ हेक्टरवरील ऊस व भात पिकांचे नुकसान.
१३ कोटी ७२ लाख रुपयांचे शेतीचे नुकसान
200921\20210919_170340.heic
करवीर तालुक्यातील उसाच्या शेती ची माती दाल्याचे चित्र