कोल्हापूरजवळील कुंभी नदीत दाम्पत्य बेपत्ता
By Admin | Updated: July 16, 2017 15:41 IST2017-07-16T15:41:35+5:302017-07-16T15:41:35+5:30
कुंभीवरील गोठे येथील दुर्घटना : दुचाकी जप्त

कोल्हापूरजवळील कुंभी नदीत दाम्पत्य बेपत्ता
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : पन्हाळा तालुक्यातुल कळे (जि. कोल्हापूर) गावाजवळील कुंभी नदीच्या पात्रात श्रीकांत धोंडी कांबळे (वय ३९, रा. पणुत्रे, ता. पन्हाळा) आणि लता (वय ३४) हे दाम्पत्य रविवारी बेपत्ता झाले आहे. यासंदर्भात कळे पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
आपली पाच वर्षांची मुलगी उत्कर्षा आजारी असल्यामुळे पणुत्रे येथून कळे येथील रुग्णालयात तिला दाखविण्यासाठी घेउन जातो, असे नातेवाईकांना सांगून श्रीकांत आणि लता हे रविवारी सकाळी दुचाकीवरुन (एमएच 0९ ए एफ ६६0४) बाहेर पडले होते. १0. ३0 वाजण्याच्या सुमारास कुंभी नदीवरील गोठे बंधाऱ्यावर पाच वर्षाची मुलगी उत्कर्षा धरणावर रडत बसल्याचे या बंधाऱ्यावरुन ये-जा करणाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी चौकशी केली असता आई-वडिलांनी नदीत उडी मारल्याचे समजले. याबाबत तत्काळ पोलिस पाटील यांना कळविण्यात आले. यानंतर तत्काळ कळे पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी श्रीकांत यांच्या वडीलांशी संपर्क साधून बोलावून घेतले आणि घाबरलेल्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली आहे. पाण्यात पडलेल्या श्रीकांत आणि लता यांचा शोध अद्याप सुरु आहे. पोलिसांनी व्हाईट आर्मीच्या जवानांना पाचारण केले असून ते कुंभी नदीपात्रात या दाम्पत्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक माहिती पोलिस घेत आहेत.
कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मंगेश देसाई यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते अधिक तपास करीत आहेत. श्रीकांत हे शेती करतात. १४ वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. उत्कर्ष (वय ७), उत्कर्षा (वय ५) आणि तृप्ती (वय १३) अशी मुलांची नावे आहेत. लता यांचे माहेर आकुर्डे ता. पन्हाळा येथील आहे. श्रीकांत यांना दोन बहिणी आहेत.