के.एम.टी.ची चाके थांबणार
By Admin | Updated: July 7, 2014 00:39 IST2014-07-07T00:39:21+5:302014-07-07T00:39:34+5:30
कर्मचारी आजपासून संपावर : के.एम.टी. बंद पाडण्याचा प्रशासनाचा डाव : कर्मचारी : दोन महिने पगार नाही

के.एम.टी.ची चाके थांबणार
कोल्हापूर : महापालिका परिवहन उपक्रम असलेल्या के.एम.टी.च्या कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने पगार मिळालेला नाही. पगारासह अन्य मागण्या व समस्यांबाबत अर्ज-निवेदने देऊनही प्रशासन ढिम्मच आहे. पगार नसल्याने जगणेच मुश्कील झाले आहे. ‘सांगा कसं जगायचं’ अशी आर्त हाक देत के.एम.टी.च्या कर्मचाऱ्यांनी उद्या, सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य झाल्याखेरीज आता माघार नाही, असा इशाराही आज, रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कामगारांनी दिला. रिक्तपदे भरा, वेळेत पगार द्या, नियमित व न्यायहक्काने ड्युटी लावा, रोस्टरची अंमलबजावणी करा, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सेवेत घ्या, आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. २३ जूनला प्रशासनास संपाबाबत पत्र दिले. मात्र, प्रभारी व्यवस्थापक संजय भोसले यांना याची दखल घ्यावी वाटली नाही. भोसले यांनी शनिवारी (दि. ५) सायंकाळी पत्र पाठवून मी १५ दिवस बाहेरगावी जात आहे. त्यामुळे संपाबाबत चर्चा करता येणे शक्य नाही, तूर्त संप पुढे ढकलावा, असे उत्तर दिले. मुळात लिपिक म्हणून सेवेत असलेल्या संजय भोसले यांना दुखण्याबाबत काही माहिती नाही. याप्रश्नी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आनंद आठल्ये यांनी केली.