क्षीरसागर समर्थकांकडून मोरेंंना मारहाण
By Admin | Updated: October 16, 2014 01:08 IST2014-10-16T01:06:25+5:302014-10-16T01:08:00+5:30
शनिवार पेठेतील घटना : परिसरात मोठा तणाव; निवडणुकीतील वाद

क्षीरसागर समर्थकांकडून मोरेंंना मारहाण
कोल्हापूर : स्वीय सहायकास मारहाण केल्याच्या रागातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांना आज, बुधवारी शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयाच्या परिसरात मारहाण झाली. या घटनेमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या मारहाणीनंतर मोरे यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी नेले. याठिकाणी मोरे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ही मारहाण आमदार क्षीरसागर यांच्याकडूनच झाल्याची घटनास्थळी चर्चा होती; परंतु पोलिसांत तशी नोंद झालेली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयात मतदान शांततेत सुरू होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पोलीस मतदान केंद्र परिसरातील कार्यकर्त्यांना बाहेर काढत होते. त्यावेळी क्षीरसागर यांचा स्वीय सहायक राहुल बंदोडे तिथे थांबले होते. इतर उमेदवारांच्या समर्थकांनीही बंदोडे यांना बाहेर काढा, अशी मागणी केली. त्यावरून मोरे व बंदोडे यांच्यात वाद झाला व त्यांना धक्काबुकी झाली. ही माहिती आमदार क्षीरसागर यांना समजताच ते कार्यकर्त्यांसह खोलखंडोबाजवळ पद्माराजे विद्यालय मतदान केंद्राकडे गेले. ही मारहाण नंदकुमार मोरे यांनी केल्याच्या संशयावरून तेथे थांबलेल्या मोरे यांना क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. हा प्रकार समजताच बंदोबस्तासाठी असलेले पोलीस तेथे गेले व जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे घटनास्थळी आले. त्यांनी सर्वांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. त्यामुळे नेमकी मारहाण कोणी केली, हा प्रकार नेमका कशावरून झाला, यासंबंधीची चर्चा सुरू झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयाच्या आवारात थांबून होते.