क्षारपडमुक्ती योजना शेतकऱ्यांना ठरली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:35+5:302021-02-05T06:59:35+5:30

भालचंद्र नांद्रेकर दानोळी : गेली पंचवीस वर्षे शेती फक्त सात-बारावर नावालाच होती. क्षारपडीमुळे नापीक बनली होती. भविष्यात अशी शेती ...

Ksharapadamukti Yojana is a lifeline for farmers | क्षारपडमुक्ती योजना शेतकऱ्यांना ठरली संजीवनी

क्षारपडमुक्ती योजना शेतकऱ्यांना ठरली संजीवनी

भालचंद्र नांद्रेकर

दानोळी

: गेली पंचवीस वर्षे शेती फक्त सात-बारावर नावालाच होती. क्षारपडीमुळे नापीक बनली होती. भविष्यात अशी शेती पिकू शकेल, याची आशाही सोडली होती. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने क्षारपडमुक्त योजना अशा जमिनीला संजीवनी ठरली आणि कवठेसार (ता. शिरोळ) येथील पूर्णत: क्षारपड व निमक्षारपड अशी चारशेहून अधिक एकर क्षेत्रातील जमीन पिकविण्यायोग्य झाली.

जमिनीत क्षाराचे प्रमाण हळूहळू वाढून शेती पूर्णत: नापीक बनली. कोणतेही पीक किंवा गवतही उगवत नव्हते. काटेरी झाडाझुडपांमध्ये शेत हरवले होते. क्षारपड म्हणजे कधीही न पिकणारी शेती, असा जणू शिक्काच पडला. अशा शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडून गेली तर अनेकांनी गरजेपोटी कवडीमोल किमतीत शेत विकले. क्षारपड जमिनीत चर काढून सच्छिद्र पाइपचे जाळे टाकून सायपन पद्धतीने क्षारयुक्त पाणी काढले जाते. हे पाणी प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिकपणे पाइपलाइनद्वारे नदी, ओढ्यात सोडणे खर्चीक आहे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या पाइपचा वापर करून पाणी बाहेर काढल्याने मोठा खर्चही वाचला आहे. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांनी असा उपक्रम यशस्वी होतो का, तसेच असे यशस्वी झालेले उपक्रम यशस्वी झाल्याची खात्री करून आपणहून सहभागी झाले.

सध्या या योजनेतून व खासगी योजनेतून पाचशेहून अधिक एकर शेती पिकाऊ झाली असून, शेतकरी उसासह गहू, हरभरा, शाळू अशी पिके घेत आहेत. अनेक गावांत क्षारपड शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, शासनाने योजना राबविल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.

चौकट -

क्षारपडमुक्त शेतीचा फायदा कोणाला!

शेतकऱ्यांना आपली पूर्वीसारखी शेतजमीन परत मिळाली, साखर कारखान्यास ऊस वाढला, बँकांना कर्जदार मिळाले, शेतमजुरांना रोजगार मिळाला, ट्रॅक्टरधारकांना मशागतीचे काम मिळाले, तसेच शासनाचा महसूलही वाढणार.

कोट -

२५ वर्षांपासून आमचे शेत क्षारपड होते. गेल्या वर्षी सच्छिद्र पाइप टाकून क्षारयुक्त पाणी बाहेर काढले. यावर्षी लागणीचा ऊस जाऊन ३८ गुंठ्यात ५३ टन ऊस निघाला.

- राजाराम गाडवे, शेतकरी कवठेसार फोटो - ०३०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - कवठेसार (ता. शिरोळ) येथील काशीम मुलाणी यांनी आपल्या क्षारमुक्त शेतात पहिले गव्हाचे यशस्वी पीक घेतले आहे.

Web Title: Ksharapadamukti Yojana is a lifeline for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.